यामुळे दुखावलेल्या इंगुले यांनी थेट अजित पवारांशी पंगा घेऊन निवडणूक लढवली आणि जिंकूनही दाखवली. आता हाच पॅटर्न पुण्यात देखील बघायला मिळत आहेत. अजित पवारांच्या खास शिलेदाराने थेट पक्षाविरोधात दंड थोपाटले आहेत. अजित पवार गटाचे माजी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून अजित पवार गट सोडण्याचे संकेत दिले आहेत. तसेच त्यांनी निवडणूक लढण्याचा ठाम विश्वास देखील व्यक्त केला आहे.
advertisement
युवराज बेलदरे साथ सोडत असल्याने अजित पवार यांना पुण्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बेलदरे यांनी पक्षातील स्थानिक नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत पक्षातून बाहेर पडण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. इतरांमुळे मला निर्णय घेण्याची वेळ आली आहे. ज्यांनी माझा प्रवास बिघडवला त्यांना पण शुभेच्छा, अशी उपहासात्मक पोस्ट लिहून बेलदरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नेमका वाद काय आहे?
पुण्यातील प्रभाग क्रमांक ३८ (बालाजी नगर आंबेगाव कात्रज) हा आरक्षित होताना सर्वसाधारण दोन महिला आणि एक पुरुष आणि मागासवर्गीय एक पुरूष आणि एक महिला असा पाच नगरसेवकांसाठी आरक्षित वॉर्ड आहे. या ठिकाणी माजी महापौर दत्ता धनकवडे, युवराज बेलदरे आणि प्रकाश कदम हे तिघेही नगरसेवक होते.
आता ज्याप्रमाणे वॉर्ड आरक्षित करण्यात आला आहे. त्यानुसार, धनकवडे, बेलदरे किंवा कदम यांच्यापैकी एका पुरुष नगरसेवकाला थांबावं लागणार आहे. त्यांच्या जागी घरातील महिला द्यावी लागणार आहे. मात्र या क्षणाला तिघेही विद्यमान नगरसेवक स्वतः निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. यामुळे प्रभाग क्रमांक ३८ चा तिढा वाढला आहे. इथं युवराज बेलदरे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर बेलदरे यांनी थेट पक्षातून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.
"मला आणि माझ्या आंबेगावला कमी लेखणाऱ्यांनो आता वेळ सुद्धा माझी असेल आणि निकाल सुद्धा याच भूमिपुत्राच्या बाजुने असेल", अशा शब्दांत बेलदरे यांनी पोस्ट लिहिली आहे. मी अजित पवारांचा केवळ कार्यकर्ता नव्हतो, त्या व्यक्तीवर माझं विशेष प्रेम आहे आणि भविष्यात देखील असेल, मात्र इतरांमुळे निर्णय घेण्याची वेळ आली आहे. असंही बेलदरे पोस्टमध्ये म्हणाले.
