मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ८ कोटी रुपयांच्या ऑनलाइन फसवणुकीमुळे मानसिक तणावातून माजी IPS अधिकारी अमर सिंग यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पंजाब पोलिसांनी नवघर पोलीस ठाणे हद्दीतून चार जणांना ताब्यात घेतले आहे.
सूत्रांनुसार, ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून ऑनलाइन फसवणूक रॅकेटच्या इतर साखळ्यांचाही सखोल तपास केला जात आहे. या फसवणूक प्रकरणात आणखी कोण-कोण सहभागी आहे, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा काम करत आहेत.
advertisement
नेमकी फसवणूक कशी झाली
पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील रहिवासी असलेले अमर सिंग चहल हे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी पंजाब पोलिसात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आणि २०१९ मध्ये ते महानिरीक्षक (आयजी) म्हणून निवृत्त झाले. एकेकाळी प्रसिद्ध पोलीस अधिकारी असलेल्या चहल यांनी त्यांच्या १२ पानांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांचे सगळं दु:ख सांगितलं आहे.
त्यांनी लिहिले की, ८.१० कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीने ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. वेल्थ इक्विटी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या सायबर फसवणूक करणाऱ्यांनी माझी ८.१० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं त्यांनी नोटच्या सुरुवातीली लिहिलं आहे. या फसवणूक करणाऱ्यांनी "F-७७७ DBS वेल्थ इक्विटी रिसर्च ग्रुप" या नावाने व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम ग्रुप बनवला होता. त्यांनी DBS बँकेचे सीईओ असल्याचा आणि मोठ्या बँकांशी संबंधित असल्याचा दावा केला आणि विश्वास संपादन केला. त्यांनी मला स्टॉक ट्रेडिंग, IPO, OTC ट्रेड्स आणि क्वांटिटेटिव्ह फंडमध्ये जास्तीचा परतावा देण्याचं आमिष दाखवलं. त्यांनी बनावट डॅशबोर्ड तयार केला आणि खोटा नफा दाखवला. ज्यामुळे माझा विश्वास वाढला आणि मला अधिक पैसे गुंतवण्यास भाग पाडले.
मी तीन बँक खात्यांमधून ८.१० कोटी रुपये हस्तांतरित केले गेले. यासाठी ७ कोटी रुपये कर्ज घेतले गेले. गुंतवणुकीनंतर मी ५ कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खंडणी सुरू झाली. २.२५ कोटी रुपये (१.५% सेवा शुल्क + ३% कर) वसूल केले. तरीही माझे पैसे परत केले नाहीत. नंतर प्रीमियम सदस्यता शुल्क म्हणून २ कोटी रुपये मागितले गेले, त्यानंतर पुन्हा २ कोटी रुपये मागितले. हा घोटाळा ऑक्टोबरमध्ये झाला.
चहल यांनी पुढे लिहिलं की, ही एक अतिशय संघटित टोळी आहे. फक्त एसआयटी किंवा सीबीआय सारखी एजन्सीच याला पकडू शकते. त्यांनी फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा आणि पैसे वसूल करण्याची विनंती केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आत्महत्येसाठी फसवणूक करणाऱ्यांशिवाय कोणीही जबाबदार नाही. त्यांनी त्यांच्या कुटुंबाची आणि मित्रांची माफी मागितली. आता या प्रकरणात मुंबई कनेक्शन समोर आलं असून चौघांना अटक करण्यात आली आहे.
