2009 पासून अस्तित्वात आलेल्या गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघावर गेल्या दहा वर्षापासून भाजपचं वर्चस्व असून दहा वर्ष अशोक नेते भाजपचे खासदार म्हणून संसदेत प्रतिनिधित्व करत आहेत, तर यावेळी भाजपने तिसऱ्यांदा अशोक नेते यांना संधी दिली आहे. अशोक नेतेंच्या विरोधात गेली दोन वर्षे परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या डॉक्टर नामदेव उसेंडी यांना उमेदवारी नाकारून काँग्रेसने डॉक्टर नामदेव कीरसान या सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्याला उमेदवारी दिली होती. या ठिकाणी वंचित आघाडीसह बसपानेही उमेदवार उभा केला आहे. रिंगणात तब्बल 12 उमेदवार असले तरी खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये झाली आहे.
advertisement
निवणुकीआधी काँग्रेसला धक्का
भाजपचे अशोक नेते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर काँग्रेसचे नामदेव किरसान यांनी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते असलेले विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील ही निवडणूक या दोन्ही नेत्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची झाल्याचं पहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षाला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉक्टर नामदेव उसेंडी आणि कोडवते दाम्पत्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत भाजपची वाट धरली. त्यामुळे महाविकास आघाडीत असलेली अंतर्गत धुसफूस समोर आली. नेतेंच्या विरोधात दोन निवडणुकीत उभे असलेले नामदेव उसेंडी यावेळी तिसरी बार अशोक नेते असं म्हणत मतदारांसमोर अशोक नेतेसाठी मतांचा जोगवा मागत असल्याचे चित्र दिसून आले.
राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अशोक नेतेंना सोबत घेऊन भामरागड एटापल्ली आमगाव अशा काही ठिकाणी प्रचारसभा घेतल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत नेत्यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद लावली होती. या मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांच्या चार जाहीर सभा झाल्या होत्या. चार जाहीर सभांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारने या मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांनी नेतेंसाठी मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं होतं. काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान यांना निवडून आणण्याची जबाबदारी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतल्यानंतर नामदेव कीरसान यांच्या विजयासाठी सभांचा धडाका सुरू केला होता.
वाचा - ‘जर जरांगे पाटील विधानसभेला उभे राहिले तर…’, रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य
विजय वडेट्टीवार यांनी दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात हवाई दौरे करून जाहीर सभा घेत त्यांनी केंद्र सरकारसह नेतेंच्या विरोधात सभांमधून जोरदार टीका केली होती. गेल्या दहा वर्षातल्या अशोक नेतेंच्या कार्यकाळावरून काही प्रमाणात नाराजी असल्याचे चित्र निवडणुकीत पाहायला मिळालं. दहा वर्षातल्या खासदारकीवरून काँग्रेस पक्षाकडून होणाऱ्या टीकेला प्रतिउत्तर देऊन आपली बाजू मजबूत करण्याचा अशोक नेते यांनी प्रयत्न केला होता. या मतदारसंघात अजूनही ओबीसी आरक्षण, बेरोजगारी यासह रस्त्यांचा असलेला अनुशेष. काही मोठ्या रस्त्यांची झालेली दुरावस्था, मोबाईल नेटवर्कची कनेक्टिव्हिटी, शेतकऱ्यांचे प्रश्न, वन कायद्यामुळे रखडलेले प्रकल्प लोह खनिज प्रकल्पावरून होणारे आरोप प्रत्यारोप यामुळे या मतदारसंघाची ही निवडणूक गाजली होती. ही निवडणूक लोकसभेची असली तरी स्थानिक प्रश्नही या निवडणुकीत चर्चिले गेले आहेत.
वाचा - औरंगाबादमध्ये तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? वाढलेला मतदानाचा टक्का ठरणार गेमचेंजर
काँग्रेस आणि भाजप दोन्हींकडून परस्परांवर कुरघोड्या, आरोप प्रत्यारोप, शह काटशहाच राजकारण झालं होतं. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात 71.88% मतदान झाले आहे. 2019 च्या तुलनेत 0.45 टक्के मतदान कमी झाले आहे. ब्रम्हपुरी मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं. या निवडणुकीत तब्बल दोन वेळा खासदार राहिलेले अशोक नेते यांना ही निवडणूक लढताना अटीतटीची झुंज द्यावी लागली आहे. नेतेंच्या तुलनेत नवख्या असलेले डॉक्टर नामदेव किरसान यांनी अशोक नेतेंसमोर कडवे आव्हान उभे केले होते. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची झाली आहे. मतदानानंतर दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते विजयाचा दावा करत आहेत. गडचिरोलीचं पालकमंत्री पद सांभाळणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम या दोघांनी अशोक नेतेंच्या प्रचारासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. तर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नामदेव किरसान यांच्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यामुळे या वरिष्ठ नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. दोन्ही पक्षाकडून दावे प्रतिदावे होत असले तरी मतदार राजाने नेमका कुणाला कॉल दिला आहे हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
