सायकल व्यवसायात 1936 सालापासून कार्यरत असलेले आणि सध्या तिसरी पिढी व्यवसाय सांभाळत असलेले सायकल व्यावसायिक सचिन केवडे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मते, गेल्या 15 वर्षांत सायकल व्यवसायात प्रचंड बदल झाले आहेत. पूर्वी काही ठराविक ब्रँड्स आणि मर्यादित मॉडेल्स उपलब्ध असायचे. मात्र, आता भारतीय आणि परदेशातून आयात (इम्पोर्टेड) सायकलींच्या अनेक सिरीज बाजारात पाहायला मिळतात.
advertisement
आजच्या घडीला सायकलींचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी स्वतंत्र सिरीज, दैनंदिन वापरासाठी वेगळ्या सायकली, तर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी हलक्या वजनाच्या आणि ॲडव्हान्स गिअर असलेल्या सायकली बाजारात आहेत. सायकलींच्या मुख्य प्रकारांमध्ये सिटी बाईक, माउंटन स्टेरिंग बाईक आणि रोड बाईक यांचा समावेश होतो. सिटी बाईक या शहरातील सामान्य रस्त्यांवर चालवण्यासाठी असतात. माउंटन स्टेरिंग बाईक या रस्त्यावर तसेच ऑफ-रोड वापरासाठी योग्य असतात. तर रोड बाईक या विशेषतः रेसिंग आणि स्पर्धांसाठी वापरल्या जातात.
सायकलींचे प्रकार
सध्या सुरू असलेल्या सायकल ग्रँड टूर स्पर्धेमध्ये प्रामुख्याने रोड बाईक रेसिंग प्रकारातील सायकली वापरल्या जात आहेत. या सायकली बेसिक मॉडेलपासून ते प्रीमियम श्रेणीपर्यंत असतात. या सायकलींचे फ्रेम्स प्रामुख्याने कार्बनचे असल्यामुळे त्या अत्यंत हलक्या वजनाच्या असतात. लांब पल्ल्याच्या प्रवासात चढ-उतार सहज पार करता यावेत यासाठी 21, 24 किंवा 27 गिअर असलेल्या सायकली वापरल्या जातात.
रेसिंग आणि लाँगरूटसाठी सायकल
रेसिंग आणि लॉंग रूटसाठी वापरल्या जाणाऱ्या सायकलींचे वजन साधारण 3 ते 4 किलोपर्यंत असते, तर कार्बन हँडल आणि फ्रेम असलेल्या सायकलींचे वजन 2 ते 3 किलोपर्यंत कमी होते. यामुळेच या सायकलींची किंमतही वाढते, अशा प्रीमियम सायकलींची किंमत काही वेळा 20 लाख रुपयांपर्यंत जाते.
आरोग्याबाबत जागरूकता
आरोग्याबाबत वाढलेली जागरूकता आणि फिटनेसकडे असलेला कल यामुळे सायकलिंगकडे नागरिकांचा ओढा वाढत असल्याचे चित्र पुण्यात दिसून येत आहे. सायकल ग्रँड टूरमुळे हा छंद आता स्पर्धात्मक आणि प्रेरणादायी स्वरूपात पुढे येत आहे.





