मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे, लवेल, आवाशी या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. ही वाहतूक कोंडी सोडवताना प्रशासनाची चांगली दमछाक झाली आहे, तर पुढील दोन ते तीन दिवस यापेक्षा अधिक रहदारी महामार्गावर होण्याची शक्यता बोलली जात आहे. मुंबई- गोवा महामार्गावर शनिवारी आणि रविवारी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. महामार्गावर दोन- तीन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा असल्यामुळे प्रवाशांचा जीव अगदीच मेटाकुटीला आला आहे.
advertisement
बुधवारी (२७ ऑगस्ट) गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीपर्यंत मुहूर्त गाठत गणरायाची प्राण प्रतिष्ठापना करण्यासाठी कोकणवासीय आपआपल्या गावाच्या दिशेनं रवाना झाले आहे. मुंबई गोवा महामार्गासोबतच इतर पर्यायी रस्त्यांवरही मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरू आहे. त्यामुळं कोकणच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व वाटांवर कमालीची गर्दी पाहायला मिळत आहे. मंगळवारपासूनच कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आणि शनिवार रात्रीपासून हा ओघ आणखी वाढला. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचेही हाल होत असून ट्रॅफिक सुरळित करताना पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.
