धनंजय मुंडेंचा इंदोर येथील एका हॉटेलमध्ये मर्डर होणार होता. मात्र त्यांना भय्यूजी महाराजांनी वाचवलं, असा गौप्यस्फोट रत्नाकर गुट्टे यांनी केला आहे. शिवाय धनंजय मुंडे कोणत्या हॉटेलमध्ये थांबले होते, याचीही माहिती आपल्याकडे आहे. मात्र आपण ती माहिती सार्वजनिक करणार नाही. पण तुमचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा रत्नाकर गुट्टे यांनी दिला आहे. गुट्टे यांच्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
advertisement
रत्नाकर गुट्टे नक्की काय म्हणाले?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडेंवर जहरी टीका केली आहे. "धनूभाऊ, तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, पण भय्यूजी महाराज यांनी तुम्हाला वाचवलं, तुम्ही कोणत्या हॉटेलवर होतात हे देखील मला माहिती आहे. पण मी हे सगळेच आता काढणार नाही. तुम्ही सुरुवात केली आहे पण शेवट मी करणार आहे. तुम्ही मला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला, तुम्ही माझ्या विरोधात कोणाकोणाला उमेदवारी दिली, त्यांच्यासाठी किती ताकद लावली, हे देखील मला माहित आहे. पण माझी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनता हीच माझं बुलेटप्रूफ जॅकेट आहे, त्यामुळे माझा पराभव होऊ शकला नाही, मी प्रचंड मताधिक्याने विजयी झालो, असं रत्नाकर गुट्टे म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी गंगाखेडमध्ये सभा घेतली होती. या सभेत त्यांनी रत्नाकर गुट्टे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर १६०० कोटींचं कर्ज उचललं ते नीरव मोदी आहेत, अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी टीका केली होती. याला उत्तर देताना गुट्टे यांनी धनंजय मुंडेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.
"तुम्ही मला नीरव मोदी म्हणालात, पण तुम्ही तर विजय मल्ल्या आहात, कारण विजय मल्ल्याच्या आवडी आणि तुमच्या आवडीनिवडी एकच आहेत. तुम्ही गंगाखेडला आलात, मला तर परळीला यायला फक्त पंधरा मिनिटं लागतात, मी राजा आहे, मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ शकतो, मी त्या पक्षांच्या स्टेजवर जाईन पण धनु भाऊ तुमचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.
