मानसी केमिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना तब्बल 6 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज असलेली नोकरी मिळाली होती. मात्र नोकरी करत असतानाच आपण वेगळं काहीतरी करावं ही कल्पना त्यांच्या मनात होती. पर्यावरण पूरक, शाश्वत आणि समाजोपयोगी व्यवसाय करण्याची त्यांची इच्छा होती. याच विचारातून त्यांनी गाईपासून मिळणाऱ्या विविध घटकांचा अभ्यास सुरू केला.
advertisement
आज गाईचे दूध बंद झाले की अनेक ठिकाणी गाईंना मारले जाते. मात्र गाईपासून दूधाव्यतिरिक्तही अनेक उपयोगी गोष्टी तयार करता येऊ शकतात, असे मानसी सांगतात. याच विचारातून त्यांनी गाईच्या शेणाचा अभ्यास केला. सुरुवातीला शेणापासून धूप, अगरबत्ती तयार केली जाते हे लक्षात आले. पण हे प्रॉडक्ट्स अनेक जण बनवत असल्याने त्यांनी काहीतरी वेगळं, नाविन्यपूर्ण आणि कलात्मक करण्याचा निर्णय घेतला.
लहानपणापासूनच आर्टिस्टिक गोष्टींची आवड असल्याने मानसी यांनी गाईच्या शेणापासून विविध सजावटी वस्तू तयार करण्यास सुरुवात केली. आज त्या गाईच्या शेणापासून मिरर फ्रेम्स, नेम प्लेट्स, हँगिंग डेकोरेशन, कार्टून फिगर, प्लांट पॉट्स अशा अनेक वस्तू बनवतात. या सर्व वस्तू पर्यावरणपूरक, आकर्षक आणि टिकाऊ आहेत. मानसी यांनी माझं वृंदावन या नावाने आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. त्यांच्या व्यवसायात सध्या 50 ते 60 प्रकारच्या व्हरायटी उपलब्ध आहेत.
या वस्तू 100 रुपयांपासून विक्रीस उपलब्ध असून ग्राहकांचा प्रतिसादही वाढत आहे. ऑनलाइन माध्यमातून तसेच प्रदर्शन, जत्रा आणि थेट विक्रीद्वारे त्या आपली उत्पादने विकतात. या संपूर्ण प्रवासात मानसी यांना कुटुंबियांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. सुरुवातीच्या अडचणी, प्रयोग आणि मेहनतीनंतर आज त्या आत्मनिर्भर उद्योजक म्हणून उभ्या आहेत. पर्यावरण संवर्धनासोबतच रोजगारनिर्मिती आणि गाईच्या उपयुक्ततेबाबत सकारात्मक संदेश देणारा हा व्यवसाय अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.