नागपूर: राज्यभरात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. नगरसेवक होण्यासाठी इच्छुक उमेदवार आताच बाशिगं बांधून तयार झाले आहे. पण, अशातच इच्छुक उमेदवारांना कानउघडणी करत दादा कोंडके यांच्या चित्रपटाचा दाखला देत भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या खास शैलीत इच्छुक उमेदवारांचे कान टोचले.
'दादा कोंडकेचा एक चित्रपट आला होता. 'थांब टकल्या भांग पाडतो'. प्रत्येक माणूस बोलतो, माझ्या वार्डामध्ये अशी परिस्थिती आहे. कधी निवडणूक लागते आणि मी निवडून येतो आणि लोकांना विचारलं तर लोकं आम्हाला म्हणतात, तुम्हाला दुसरा उमेदवार मिळाला नाही का? पण आता जनता हुशार आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की, आपल्यालाच तिकीट मिळावं. मात्र जनता आता तितकीच हुशार झाली आहे. आजकाल पक्षाची आर्थिक स्थिती चांगली आहे. आम्हीही अनेक लोकांकडून चहा-चिवडा खाल्ला आहे. आमचं अर्ध आयुष्य यातच निघून गेलं आहे. एकदा मला एक व्यक्ती भेटली. त्याने चहा आणि जिलेबी खाऊ घातली, पण “माझं काय होणार?” असा प्रश्न विचारत होता. मी त्याला म्हणालो, “तू खाऊ घाल, सर्व ठीक होईल.”, असा किस्सा सांगताच एकच हश्शा पिकली.
advertisement
'त्यावेळी आमच्या हातात काहीच नव्हतं. तरीही तिकीट देणारे आम्ही नाही, हे त्यांना माहीत नव्हतं. आजही अनेक लोक ताणून बसले आहेत. लोकांना वाटतं की, नितीनजी किंवा देवेंद्रजी सांगतील तर तिकीट मिळेल. असे वाटणे स्वाभाविक आहे' असंही पुढे गडकरी म्हणाले.
'ही भूक कधीही न संपणारी'
'एक महिला माझ्याकडे आली आणि ‘मला एकदा नगरसेवक बनवा’ अशी इच्छा व्यक्त केली. आम्ही तिला नगरसेवक बनवलं, मात्र महापौर बनवू शकलो नाही. त्यामुळे ती खूप रडू लागली. तिचं रडणं पाहून माझ्या आईने विचारलं, ‘हिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला का?’ मी आईला सांगितलं, ‘नाही, हिला तिकीट मिळालं नाही म्हणून रडतेय. नंतर आम्ही तिला महापौर बनवलं. त्यानंतर तिने आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली आणि आता पुन्हा ती नगरसेवकाच्या तिकिटासाठी तयार आहे. ही भूक कधीही न संपणारी आहे. महत्वाकांक्षा असणं स्वाभाविक आहे,” असं सांगत नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांमध्ये आशा, अपेक्षा आणि आकांक्षा असणे चुकीचे नाही. पण संयम राखणे गरजेचं आहे' असा सल्ला दिला.
नगरसेवक बनायचं असेल तर आधी काम करा; अन्यथा तिकीट मागू नका. मला एका ठिकाणी असं समजलं की. नवरा, बायको, मुलगा आणि बहिण चौघांनीही तिकीट मागितलं होतं. तेव्हा मी मस्करीत म्हणालो, अजून दोन जण उरले आहेत, ड्रायव्हर आणि चमच्यालाही तिकीट मागायचं राहिलंय की काय? असं म्हणतााच सभागृहात एकच हश्शा पिकली.
'कोणी कुठे जन्म घेतला, हे गुन्हा नाही. मात्र स्वतःच्या पत्नीला तिकीट मिळावं म्हणून आग्रह धरण्यापेक्षा, लोकांनीच “यांना तिकीट द्या” असं सांगावं, अशी परिस्थिती निर्माण होणं अधिक योग्य आणि लोकशाहीला साजेसं आहे' असा कानमंत्रही गडकरींनी कार्यकर्त्यांना दिला.
