मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगावमध्ये मध्यरात्री हवेत गोळीबार करण्यात आला आहे. शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून हवेत गोळीबार केला आहे. बाळू मोरे खून प्रकरणातील संशयित आरोपी सुमित भोसले यांच्या घरासमोर हा गोळीबार झाला आहे. दहशत निर्माण करण्यासाठी पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
advertisement
मध्यरात्री गोळीबार केल्यानंतर ६ संशयित आरोपी घटनास्थळावरून तीन दुचाकीवरून फरार झाले. त्यांचा घटनास्थळावरून पळून जातानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या सीसीटीव्ही व्हिडीओच्या माध्यमातून गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी संशयित आरोपींच्या घराची झडती देखील घेतली आहे. यावेळी पोलिसांना संशयिताच्या घरातून काही घातक शस्त्रे आणि जिवंत काडतुसं आढळून आली आहेत. या प्रकरणी चाळीसगाव पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात भाजपचे चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे उर्फ बाळू मोरे यांची हत्या करण्यात आली होती. मोरे हे आपल्या कार्यालयात बसलेले असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या पाच अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बाळू मोरे यांच्यावर 8 गोळ्या झाडल्या. यानंतर हल्लेखोर कारमधूनच पसार झाले होते. या हल्ल्यानंतर मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता ताज्या गोळीबाराच्या प्रकरणात मोरे यांच्या हत्येचं कनेक्शन असल्याचं सांगितलं जातंय. ज्याच्या घरासमोर गोळीबार झाला, तो सुमित भोसले बाळू मोरे हत्या प्रकरणातील संशयित आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.