सोमवारी रात्री जालन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बस स्थानक परिसरातील काही दुकाने आणि फर्निचरचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर आज सकाळी घटनास्थळी पोहोचले होते. ते पाहणी करत असतानाच, दोन फर्निचर विक्रेत्यांच्या गटांमध्ये अचानक वाद सुरू झाला आणि काही वेळातच त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गट एकमेकांना जोरदार मारहाण करत होते. ही घटना खोतकरांसमोरच घडल्याने एकच गोंधळ उडाला.
advertisement
दरम्यान, आमदार खोतकर यांनी स्वतः मध्यस्थी करत दोन्ही गटातील लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी समजूत काढून हा वाद तत्काळ मिटवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. या हाणामारीमुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती आणि वाहतूक कोंडी देखील झाली.
घटनेची माहिती मिळताच, सदर बाजार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाला पांगवून परिस्थिती पूर्ववत केली. सध्या पोलीस या दोन्ही गटांमधील वादाचे नेमके कारण शोधत आहेत. पण आमदार खोतकर यांच्यासमोरच हाणामारी झाल्याने हे प्रकरण चर्चेचा विषय ठरत आहे.