जालना, 2 सप्टेंबर : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला संजीवनी देणारे मनोज जारंगे-पाटील राज्यभरात चर्चेचा विषय झाले आहेत. शिवबा संघटनेच्या माध्यमातून मागील 12 वर्षांपासून जारंगे-पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी मध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला. याच गावात मनोज जारंगे-पाटील यांनी आमरण उपोषण सुरू करून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा वणवा पेटवला. परिणामी अंतरवाली सराटी गाव मराठा आरक्षण आंदोलाचं केंद्र बनलंय.
advertisement
जारंगे पाटलांनी आतापर्यंत 30 पेक्षा जास्त आंदोलनं केली आहेत. मुळचे बीड जिल्ह्यातील असलेले जारंगे-पाटील अंबड तालुक्यात स्थाईक झालेत. मराठा समाजाच्या आंदोलनांसाठी जारंगे-पाटलांनी त्यांची दोन एकर जमीन विकली.
पाटलांनी दोन वर्षांपूर्वी साष्ट पिंपळगाव येथे तब्बल 90 दिवस ठिय्या आंदोलन केलं होतं. शिवाय सहा दिवस उपोषणही केलं होतं. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना मारहाणीत शिवबा संघटनेचं नाव समोर आलं होतं. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मनोज जारंगे पाटलांनी पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणला आहे. मात्र हा प्रश्न सुटणार कधी? याचं उत्तर काही मिळत नाही.
जालन्याच्या लाठीचार्जचे राज्यभरात पडसाद
जालन्यातील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटू लागले. बीडच्या आष्टी शहरात मराठा समाजाकडून मुंडण आंदोलन करण्यात आलं. पंढरपूरमध्ये छत्रपती शिवाजी चौक इथे प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत घटनेचा निषेध करण्यात आला. धाराशिवमधील आंदोलनात महिलाही सहभागी झाल्याचं पहायला मिळालं. महिला पदाधिकाऱ्यांनी दुकानांवर दगडफेक केली, तर हिंगोलीच्या कन्हेरगाव नाका ते जिंतूरकडे जाणाऱ्या महामार्गावर टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. सुरजखेडा फाटा इथे हे आंदोलन करण्यात आलं. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भालगाव फाटा इथंही रास्तारोको करण्यात आला. यावेळी महामार्गावर आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर दौंडमधील मराठा महासंघाचे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून असून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, यावेळी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलकांवर पोलिसांकडून केलेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यात आला.