भाजपचे निर्विवाद वर्चस्व
जालना महानगरपालिकेच्या एकूण ६५ जागांपैकी ४१ जागांवर दणदणीत विजय मिळवत भारतीय जनता पक्षाने (BJP) सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे, त्यांच्या पत्नी सुशीला दानवे, तसेच काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी संगिता गोरंट्याल आणि पुत्र अक्षय गोरंट्याल असे महत्त्वाचे उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, महापौरपद एससी महिलांसाठी आरक्षित झाल्याने यापैकी कोणालाही या पदावर बसता येणार नाही. हा दानवे आणि गोरंट्याल यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
advertisement
महापौरपदाच्या शर्यतीतील प्रमुख चेहरे
भाजपकडून अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून चार महिला निवडून आल्या आहेत. यापैकी एका नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
१) अॅड. रिमा संदिप खरात (प्रभाग क्रमांक १४): सुशिक्षित चेहरा आणि कायद्याचे ज्ञान असल्याने त्यांचे नाव आघाडीवर आहे.
२) श्रद्धा दिपक साळवे (प्रभाग क्रमांक २): युवा नेतृत्व आणि प्रभागातील चांगली पकड ही त्यांची जमेची बाजू आहे.
३) सौ. रुपा संजय कुरील (प्रभाग क्रमांक ४): अनुभवी कार्यकर्त्या म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे.
४) वंदना अरुण मगरे (प्रभाग क्रमांक १५): तळागाळातील कार्यकर्त्या म्हणून त्या ओळखल्या जातात.
भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर भाजपचाच होणार हे निश्चित आहे. मात्र, 'जालन्याची पहिली महापौर' होण्याचा मान कोणाला मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि कैलास गोरंट्याल नेमकं कुणाचं नाव समोर करणावर यावर इथली राजकीय समीकरणं अवलंबून असणार आहेत.
