आपण कोणत्याही नवीन गोष्टींची सुरुवात करताना गणरायाची पूजा करतो. गणरायाची पूजा करून सुरुवात केल्यानंतर कार्य सफल होते अशी मान्यता आहे. माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा कशी करावी, तसेच कोणत्या चुका टाळाव्यात, याविषयीची माहिती विशाल कुलकर्णी गुरुजी यांनी लोकल18 सोबत बोलताना दिली आहे.
माघी गणेश जयंती! बाप्पा प्रसन्न होतील, सर्व संकटे दूर जातील, आज काय करावं? काय टाळावं?
advertisement
विशाल कुलकर्णी गुरुजी यांनी सांगितलं की, “यावर्षी ही चतुर्थी 22 जानेवारीला रात्री 2.48 वाजता सुरू होणार असून 23 जानेवारीला रात्री 2.29 वाजेपर्यंत राहणार आहे. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी सकाळी 11.28 ते दुपारी 1.42 असा शुभ वेळ देण्यात आली आहे. या काळात भाविक गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून विधीपूर्वक पूजा करू शकतात.”
गणपती बाप्पाची पूजा कशी करावी?
गणपती बाप्पाची पूजा करताना मूर्तीची स्थापना स्वच्छ आणि शांत ठिकाणी करावी. मूर्ती ईशान्य दिशेला असावी, अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच गणपतीच्या मूर्तीचा मागील भाग मुख्य दरवाज्याकडे नसावा. प्रतिष्ठापना केल्यानंतर दीप व धूप लावून पूजा सुरू करावी. शुद्ध पाणी, पंचामृत किंवा नारळाच्या पाण्याने गणपती बाप्पाला स्नान घालावे. त्यानंतर चंदन, लाल फुले आणि दुर्वा अर्पण कराव्यात. मूर्तीवर शेंदूर अर्पण करणे शुभ मानले जाते. गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण कराव्यात आणि मोदक किंवा लाडू असा त्यांचा आवडता प्रसाद दाखवावा.
पूजा करताना ‘ॐ गणपते नम:’ या मंत्राचा जप करावा. गणपतीच्या मूर्तीला उजव्या हाताच्या अनामिकेने गंध लावावा. हळद-कुंकू वाहताना आधी हळद व नंतर कुंकू अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर अर्पण करावे. माघी गणेश जयंतीच्या दिवशी चंद्रदर्शन टाळावे, अशीही मान्यता आहे. या दिवशी मनोभावे गणपतीची पूजा केल्यास संकटे दूर होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.





