माघी गणेश जयंती! बाप्पा प्रसन्न होतील, सर्व संकटे दूर जातील, आज काय करावं? काय टाळावं?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Maghi Ganesh Jayanti 2026: माघी गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी आणि तिळकुंद चतुर्थी अशा नावांनीही ओळखले जाते.
पुणे : आज राज्यभरात माघ गणेश जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे आराधना केल्यास मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्यातील संकटे दूर होण्यास मदत होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. शास्त्रानुसार गणपतीचे तीन अवतार मानले जातात. वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जयंती, भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेशोत्सव, तर माघ शुक्ल चतुर्थीला माघ गणेश जयंती साजरी केली जाते. आजच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात, याविषयी माहिती विशाल कुलकर्णी गुरुजी यांनी लोकल 18 सोबत बोलताना दिली आहे.
विशाल कुलकर्णी यांनी सांगितलं की, माघी गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी आणि तिळकुंद चतुर्थी अशा नावांनीही ओळखले जाते. यावर्षी ही चतुर्थी 22 जानेवारीला रात्री 2.48 वाजता सुरू होणार असून 23 जानेवारीला रात्री 2.29 वाजेपर्यंत राहणार आहे. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी सकाळी 11.28 ते दुपारी 1.42 असा शुभ वेळ देण्यात आली आहे. या काळात भाविक गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून विधीपूर्वक पूजा करू शकतात.
advertisement
माघी गणेश जयंतीला या गोष्टी करा
विशाल कुलकर्णी यांनी सांगितले की या दिवशी गणपती बाप्पाची भक्तिभावाने पूजा करावी. दिवसभर गणपतीची आराधना करावी आणि ‘ॐ गं गणपतये नम:’ हा मंत्र जपावा. गणपतीला आवडणारी दुर्वा आणि फुले अर्पण करावीत. शक्य असल्यास उपवास करावा आणि गणेश स्तोत्र वाचावे. पूजेच्या वेळी दिवा, अगरबत्ती किंवा धूप, फळे आणि फुले देवाला अर्पण करावीत. दानधर्म करावा नैवेद्य म्हणून तिळगुळाचे लाडू किंवा मोदक बाप्पाला अर्पण करावा.
advertisement
माघी गणेश जयंतीला या चुका करू नका
गणेश जयंतीच्या काळात चंद्रदर्शन करू नये, असे मानले जाते. चंद्र पाहिल्यास खोटा कलंक लागू शकतो, अशी मान्यता आहे. या पवित्र दिवशी मांसाहार आणि मद्यपान टाळावे. या दिवशी कोणाशीही वाद घालू नये किंवा अपशब्द वापरू नयेत. संयम ठेवावा आणि मन शांत ठेवावे. गणपतीच्या पूजेमध्ये तुळस अर्पण करू नये. गणपती बाप्पाला निसर्ग प्रिय असल्याने या दिवशी झाडे तोडू नयेत किंवा निसर्गाला हानी पोहोचेल, असे कोणतेही कृत्य करू नये.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 7:42 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
माघी गणेश जयंती! बाप्पा प्रसन्न होतील, सर्व संकटे दूर जातील, आज काय करावं? काय टाळावं?








