जालना - सध्या संपूर्ण राज्यात नवरात्र उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या काळामध्ये खाद्य पदार्थांबरोबरच विविध वस्तूंच्या मागणीत वाढ होत असते. त्यामुळे दरामध्येही वाढ पाहायला मिळते. सणासुदींच्या काळात मिठाई तयार करण्यासाठी खव्याला मोठी मागणी असल्याने खव्याचे दरही तेजित असल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच अनुभव जालन्यातील खवा बाजारात पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत खव्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
नवरात्र उत्सव सुरू झाल्याने खव्याच्या दरामध्ये 100 रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. मागील आठवड्यात 200 ते 220 रुपये प्रति किलो असलेला खव्याचा दर आता 280 ते 300 रुपये प्रति किलो झाले आहेत. जालना शहरामध्ये जुना मोंढा परिसरात खवा बाजार भरतो. या बाजारात दररोज 3 ते 5 क्विंटल खव्याची आवक होते.
नवरात्र उत्सवात खव्याला चांगली मागणी असल्याने खव्याच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहेत. दरम्यान, दिवाळीमध्ये खव्याचे दर 400 रुपये प्रति किलोपर्यंत होऊ शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर खव्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना वैरण खाल्ली पेंड इत्यादी जनावरांना देण्यासाठी पैसे उरत आहेत. तसेच आणखी काही दिवसांनी दिवाळी सण येत आहे. तेव्हा खव्याचे दर 400 ते 500 रुपये प्रति किलो पर्यंत जाण्याची शक्यता आहे. बाजारात खव्याची उपलब्धता कमी असल्याने दरात सुधारणा झाल्याचे हवा व्यापारी शक्ती काटकर यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यातील निवडुंगा येथील शेतकरी दिगंबर वाकचौरे यांनी खवा बाजारात 10 किलो खवा विक्रीसाठी आणला होता. त्यांच्या खव्याला 300 रुपये प्रति किलो असा दर मिळाला. नवरात्र उत्सव सुरू असल्याने खव्याला चांगला दर मिळत आहे आणि या दराबाबत आम्ही समाधानी आहोत तसेच दिवाळीत 400 रुपयांपर्यंत दर मिळेल, अशी प्रतिक्रिया शेतकरी वाकचौरे यांनी लोकल18 शी बोलताना व्यक्त केली.