जालना - संपूर्ण राज्यभरात नवरात्र उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. गरबा आणि दांडियाचा उत्साह देखील अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर देवीची मंदिरे ही भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. विविध ठिकाणी यात्रा, उत्सव आणि केलेले नवस पूर्ण करण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते.
जालना शहरामध्ये असलेल्या दुर्गादेवी मंदिर परिसरामध्ये मोठी यात्रा भरली आहे. येथील देवीची मूर्ती ही स्वयंभू असल्याची सांगितले जाते. यामुळे शहरातील नागरिकांची दर्शनासाठी इथे मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सातव्या माळेला देवीचा मुखवटा बदलण्यात आला असून देवीला वस्त्रालंकाराने सजवण्यात आला आहे. त्यामुळे देवीचं साजीर गोजिर रूप भाविक भक्तांना पाहायला मिळते आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने देवीच्या गाभाऱ्यातून घेतलेला हा आढावा.
advertisement
जालना शहरातील जीएस महाविद्यालय परिसरात असणारी दुर्गामाता अतिशय प्रसिद्ध आहे. भाविकांची मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून देखील या देवीला ओळखले जाते. आंबा शंकर श्री माळी यांचे पणजोबा यांच्या स्वप्नामध्ये दुर्गादेवी आली. मी जमिनीखाली असून माझा जमिनीखाली दम कोंडत आहे, मला वर काढा, असे देवीने त्यांना स्वप्नात सांगितले.
यानंतर श्री माळी यांच्या आजोबांनी इथे खोदकाम केले असता त्यांना देवीची मूर्ती आढळून आली. त्यांनी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्याच ठिकाणी केली तेव्हापासून या ठिकाणी देवीचा अस्तित्व आहे. या ठिकाणी असलेली ही दुर्गा मातेची मूर्ती स्वयंभू प्रगट झालेली असल्याने देखील या मंदिराला विशेष असे महत्त्व आहे.
मार्बलचा चुरा फेविकॉल वापरून देवीच्या मुखवटयाला नवीन स्वरूप देण्यात आला आहे. त्याचबरोबर देवीला विविध वस्त्रालंकारांनी सजवण्यात आला आहे. देवीला मोठा मोरपंखी हार देखील घालण्यात आला आहे. यानंतर अभिषेक होऊन देवीची आरती करण्यात येते. सातवी माळ असल्याने भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत असून देवीचे सुंदर आणि सुबक रूप पाहण्यासाठी भाविक सकाळपासूनच गर्दी करत आहेत.
या मंदिराची स्थापना माझ्या पणजोबांच्या हाताने झाली आहे. जवळपास या गोष्टीला 200 वर्ष झाली आहेत. ब्रिटिश काळापासून हे मंदिर अस्तित्त्वात असून इथे भाविक भक्तांची इच्छा पूर्ण होते. देवीच्या आशीर्वादाने मनोकामना पूर्ण होत असल्याने भाविकांची इथे मोठी गर्दी असते, असे मंदिराचे पुजारी पंडित अंबाशंकर भिकूलाल श्री माळी यांनी सांगितले.
सूचना - वर दिलेली माहिती ही मंदिराचे पुजारी यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.