जालना - सोयाबीनच्या दरात मोठी घसरण होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने कच्च्या तेलाच्या आयातीवर 20 टक्के आयात कर लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाचा फारसा परिणाम सोयाबीन दरावर झाल्याचे पाहायला मिळत नाही आहे. या सर्व परिस्थितीत सोयाबीनची आवक वाढल्याने दरामध्ये 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल एवढी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या निर्णयानंतर 10% आर्द्रता असलेल्या सोयाबीनला 4600 प्रतिक्विंटल एवढा दर मिळत होता. मात्र, आता हेच दर 4300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
दसरा, दिवाळी सण जवळ आल्याने त्याचप्रमाणे रब्बी हंगामातील तयारीसाठी बी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्यामुळे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या आवकमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सध्या बाजार समितीत 20 ते 25 हजार क्विंटल सोयाबीनची आवक दररोज होत आहे.
या सोयाबीनला आर्द्रतेनुसार 3000 रुपये प्रति क्विंटल ते 4300 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान दर मिळत आहे. 20% आर्द्रता असणाऱ्या सोयाबीनला 3700 तर 10% आर्द्रता असणाऱ्या सोयाबीनला 4350 रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे व्यापारी संजय कानडे यांनी सांगितले. हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवल्यानेही अनेक शेतकरी ओला सोयाबीन बाजारात विक्रीसाठी घेऊन येत आहेत. आवक वाढल्याने दर दबावात आले असून नाफेड खरेदी सुरू झाल्यानंतर दरात 100 ते 200 रुपयांची सुधारणा होऊ शकते, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
भविष्यात दर वाढतील, असे वाटत नाही -
घनसावंगी तालुक्यातील शेतकरी श्रीनिवास बोडके यांनी बाजार समितीमध्ये 30कट्टे सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. त्यांच्या सोयाबीनला 3900 असा दर मिळाला. या दराबाबत आम्ही समाधानी नाही. मात्र, शेतात ऊस लावायचा आहे. त्यासाठी खर्च आहे. त्यामुळे सोयाबीनची बाजार समितीमध्ये विक्री केली. भविष्यात दर वाढतील, असे वाटत नाही. नाफेड खरेदी बाबतही नुसती चर्चा आहे. मात्र, अजूनही नाफेडची खरेदी सुरू झाली नाही, असे बोडके यांनी सांगितले.
7 ते 8 हजार प्रति क्विंटल दर हवा -
माझ्याकडे 10 एकर सोयाबीन शेतात उभा आहे. सोयाबीनची कापणी बाकी आहे. मात्र, या दराबाबत मी अजिबात समाधानी नाही. सोयाबीनला किमान 7 ते 8 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळायला हवा. सोयाबीनपासून निघणारे तेल हे अत्यावश्यक सेवांमध्ये येते. त्यामुळे सरकार याची दर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करते. मात्र, सरकारने शेतकऱ्यांना लागणाऱ्या खत आणि औषधांच्या किमती देखील नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केल्यास शेतकरी समाधानी होतील, असे जाफराबाद तालुक्यातील शेतकरी प्रल्हाद बोराडे यांनी सांगितले.