मिळालेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शिवनेरी लॉजवर एका वृद्धाचा मृतदेह आढळल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या आदेशानुसार, तात्काळ पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी केली असता, संबंधित व्यापारी मृत अवस्थेत आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी त्यांच्या बॅगेची तपासणी केली असता, त्यात आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रे आढळून आली. त्यानुसार मृताचे नाव विश्वनाथ भानुदास रोडे (वय ७५, रा. लातूर शहर) असल्याचे समोर आलं आहे.
advertisement
हे व्यापारी लातूरचे असून, व्यापाराच्या संदर्भात कापड खरेदीसाठी ते नेहमी जालना शहरात येत-जात असत. त्यामुळे त्याची जालन्यात चांगली व्यापारी ओळख होती आणि याच कारणामुळे तो शिवनेरी लॉजवर मुक्कामी राहिले होते, अशी प्राथमिक माहिती आहे.
पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच या व्यापाऱ्याच्या मृत्यूचे नेमके कारण आणि वेळ स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. ते जालन्यात कधी आले आणि लॉजवर कधी मुक्कामी राहिले, याचा तपास पोलीस करत आहेत. दिवाळीच्या तोंडावर व्यापाऱ्याच्या रहस्यमय मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.