लढायचे की पाडायचे? यासाठी अंतरवाली सराटी येथे राज्यातील मराठा बांधवांच्या प्रतिनिधींची बैठक मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली होती. या बैठकीत त्यांनी मराठा समाजाच्या प्रतिनिधींच्या भावना जाणून घेतल्या. आपण स्वत: निवडणूक लढायची की ज्यांनी आपले वाटोळे केले, त्यांना पाडण्याची भूमिका घ्यायची? असा प्रश्न जरांगे यांनी समाज बांधवांना विचारला. कोणतीही भूमिका घेतली तरी त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम आपणाला पाहायला लागतील, असे सांगत जरांगे यांनी मध्यम मार्ग काढला.
advertisement
मनोज जरांगे यांच्या ३ मोठ्या घोषणा
१) निवडून येतील तिथे उमेदवार उभे करावेत.
२)अनुसूचित जाती (एसटी) आणि अनुसूचित जमाती (एससी) म्हणजेच राखीव जागांवर उमेदवार देऊ नयेत. तिथे आपल्या समाजाची मते आपण आपल्याला वाटतात त्यांच्यामागे उभी करू.
३) जिथे आपण उमेदवार उभे करणार नाही तिथे आपल्या मागणीशी ज्याला आस्था असेल तिथे त्यांना पाठिंबा देऊ, निवडून आल्यावर आमच्यासाठी आवाज उठवशील, असे आपण त्याच्याकडून स्टॅम्प पेपरवर लिहून घेऊ.
एका जातीवर उमेदवार निवडून येणार नाही, दोन चार दिवसांत समीकरणे जुळतात का हे पाहतो
विविध मतदारसंघातील परिस्थिती लक्षात घेतली तर केवळ एका जातीवर उमेदवार निवडून येऊ शकत नाही, हे वास्तव आहे. त्यासाठी विजयी समीकरणे जुळतायेत का, याची चाचपणी पुढच्या दोन चार दिवसांत करतो. तुम्ही अर्ज भरायला सुरुवात करा. परंतु २९ तारखेला मी ज्यावेळी संबंधितांना अर्ज माघारी घ्यायच्या सूचना करेल, त्यावेळी कोणतीही सबब न सांगता अर्ज माघारी घ्यावा. जर अर्ज माघारी घेतला नाही तर मी समजून जाईन की तुम्ही कुठल्या तरी पक्षाकडून पैसे घेतले आहेत.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, माझा विश्वासघात होऊ देऊ नका. जर लढायचे ठरले तर दोघांचेही कार्यक्रम करायचे. आपले मराठा आंदोलन आणि मी स्वत: उघडा पडलो तर आपली जात संपून जाईल, त्यामुळे काळजीपूर्वक वागा. १०० टक्के मतदान करा आणि ज्यांनी आपल्याला संपविण्याच्या प्रयत्न केला, त्यांना आपण आता संपवायचे, असे जरांगे म्हणाले.
