जालना : महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी शासनानं 2024 साली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना सुरू केली. या योजने अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारनं काही पात्रतेच्या अटी आखून दिलेल्या आहेत. त्यानुसार...
21 ते 65 वयोगटातील महाराष्ट्राच्या रहिवासी असलेल्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवू शकतात. परंतु लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावं. तसंच पात्रतेच्या इतरही काही अटी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोट्यावधी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. परंतु आता मात्र सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी होणार अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. तसंच काही ठिकाणी लाडकी बहीण योजनेतून मिळालेले पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरून परत काढून घेतल्याच्याही चर्चा आहेत. याबाबत जालना जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.
advertisement
अधिकारी कोमल कोरे यांनी सांगितलं की, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमार्फत बऱ्याच लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे. परंतु आता अशी माहिती मिळतेय की, अर्जांची पडताळणी होणार आहे आणि काही लाभार्थ्यांचा लाभ बंद होणार आहे. परंतु याबाबत सध्या शासनाकडून काहीही मार्गदर्शक सूचना नसल्यामुळे सध्यातरी आपण कुठल्याही प्रकारची पडताळणी करत नाही आहोत. परंतु कार्यालयात बऱ्याचशा तक्रारी येत आहेत. ज्या लोकांना चुकून लाभ दिला जात आहे, ते लोक पैसेही भरताहेत. परंतु कुठल्याही प्रकारचे गाइडलाइन्स नसल्यामुळे, जोपर्यंत मार्गदर्शक सूचना प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत सध्या आपण या योजनेवर काहीही करत नाही आहोत.'
तसंच 'जे लोक चुकून लाभ घेत असतील, त्यांच्या निदर्शनास येत असेल, ते पात्र नसतील त्यांनी स्वत:हून पुढे यावं आणि शासनाकडे तो निधी परत करावा', असं आवाहनही अधिकारी कोमल कोरे यांनी केलं. त्याचबरोबर 'जालन्यात आतापर्यंत अंदाजे 10 ते 15 लोकांनी शासनखाती पैसे भरलेले आहेत', अशी माहितीही त्यांनी दिली.