सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरच्या आत्महत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. बीडच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येला पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा कारणीभूत असल्याचे खुद्द पीडितीने स्वत:च्या हातावर लिहिले. गोपाळ बदने याने वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोपही पीडितेने चिठ्ठीतून केला. या सगळ्याचा तपास पोलीस करीत असून फलटण पोलीस स्टेशनला कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शनिवारी भेट दिली.
advertisement
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी फलटणमध्ये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण शहर पोलीस ठाण्याचे रविवारी सकाळी उद्घाटन होणार असून तयारीचा आढावा घेण्याकरिता सुनील फुलारी फलटणला आले आहेत. तसेच डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी तपासाच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्याकडून सुनील फुलारी यांनी माहिती घेतली. यावेळी डॉक्टर आत्महत्या प्रकरण पोलिसांनी योग्य पद्धतीने हाताळले नाही अशा शब्दात फुलारी यांनी पोलिसांना सुनावले.
खाकीवर गंभीर आरोप झाल्याने सुनील फुलारी यांनी पोलिसांना सुनावले
खाकीवर गंभीर आरोप झाल्याने सुनील फुलारी यांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. तुम्ही हे प्रकरण अजिबात नीट हाताळले नाही. अशा घटना जर व्हायला लागल्या तर खाकीवरचा विश्वास उडून जाईल, असे फुलारी म्हणाले.
