कोल्हापूर : सर्दी, खोकला किंवा कणकण असल्यावर तसेच, डोके किंवा पोटात दुखल्यावर अनेक अँटिबायोटिक्स घेतात. इतकेच नव्हे तर दोन-चार दिवसांसाठी बाहेर जात असताना प्रवासात कोणतीही तक्रार नको म्हणून अँटिबायोटिक्स घेतात. त्यात भर म्हणजे कोरोनाची साथ आल्यापासून लोकांमध्ये अँटी-बायोटिक्स (औषधे) घेण्याची सवय वाढली आहे.
डोकेदुखी, ओटीपोटात दुखणे आणि खोकला-सर्दी अशा त्रासावर कित्येक जण डॉक्टरांचा सल्ला न घेताच अँटी-बायोटिक्सचे सेवन करतात. त्यामुळे त्वरित आराम तर मिळतो, पण त्यामुळे शरीराचे काय नुकसान होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या औषधांमुळे अनेक प्रकारचे गंभीर आजार होत असल्याचे डॉक्टर सांगतात.
advertisement
अशा प्रकारचे आजार काही दिवसातच बरे होतात. पण तरीही काही लोक अँटी-बायोटिक्स घेतात. यामुळे शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने डॉ. साई प्रसाद यांच्याशी संवाद साधला. डॉ. साई प्रसाद हे गेल्या अनेक वर्षांपासून ते वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावत आहेत. तसेच सध्या कोल्हापुरातील डायमंड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागाचे प्रमुख आहेत.
प्रतिजैविके म्हणजेच अँटी बायोटिक्स म्हणजे काय?
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, जगातील सर्वाधिक प्रभावी ठरलेल्या 10 वैज्ञानिक शोधांपैकी एक मानली जाणारी प्रतिजैविके, हे जिवंत जीवाणू किंवा रासायनिक संयुगे असतात. पूर्वी न्यूमोनिया, डांग्या खोकला, संधिवाताचा ताप अशा जीवाणूजन्य आजारांवर प्रभावी औषधे उपलब्ध नव्हती. ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना पेनिसिलीन आणि त्याच्या प्रतिजैविक म्हणून वापराच्या क्रांतिकारी शोधाबाबत 1945 मध्ये ‘नोबेल’ देण्यात आले.
अनेक जीवघेण्या आजारांवर प्रतिजैविकांच्या साह्याने मात करणे त्यानंतर शक्य झाले. पुढे विज्ञान प्रगत होत गेले, तसतसे अनेक प्रकारची प्रतिजैविके उपलब्ध होऊ लागली आणि अनेक असाध्य आजारांवरील उपचारांध्ये त्यांचा वापर जगभरात केला जातो.
का घेतली जातात अँटी-बायोटिक्स -
प्रतिजैविक म्हणजेच अँटी-बायोटिक्स जीवाणूविरोधी अँटीबायोटिक जीवाणू मारण्याचे काम करतात. ही औषधे सामान्यत: जिवाणूंच्या सेल सामग्रीच्या निर्मितीमध्ये हस्तक्षेप करून कार्य करतात. बॅक्टेरियोस्टॅटिक बॅक्टेरियाची वाढ थांबवते.बहुतेक अँटीबायोटिक्स काही तासांतच काम करू लागतात. अनेक वेळा डॉक्टर पेशंटला औषधांचा संपूर्ण कोर्स घेण्याचा सल्ला देतात, जेणेकरून जीवाणू पुन्हा निर्माण होऊ नयेत.
अँटी-बायोटिक्समुळे होणारे नुकसान -
अँटी-बायोटिक्सच्या अतिसेवनामुळे शरीरात या औषधांना प्रतिकारशक्ती निर्माण होते. याला अँटी-बायोटिक रेझिस्टन्स म्हणजेच प्रतिजैविक प्रतिरोधक असे म्हटले जाते. म्हणजे थोडक्यात, यामुळे आपल्या शरीरावर होणारा औषधांचा प्रभाव थांबतो. त्यामुळे केवळ आजाराचे प्रमाण वाढत नाही तर त्या आजारातून बाहेर पडायलाही वेळ लागतो. तसेच ही औषधे शरीरासाठी फायदेशीर बॅक्टेरियादेखील नष्ट करतात, असे एका संशोधनात आल्याचे डॉक्टर सांगतात.
दीर्घकालासाठी अॅँटिबायोटिक्स घेतले तर आपल्या शरीरात काय होऊ शकते?
- प्रतिजैवके ही त्या त्या जंतूंचा नाश करत असल्याने आजार बरा होतो, परंतु त्याबरोबर मोठ्या आतड्यातील उपकारक बॅक्टेरियाही नष्ट होतात. हे जंतू पचलेल्या आहाररसाचे विघटन व शरीरात शोषण करण्यास मदत करतात. मात्र, हे उपकारक जंतू नष्ट झाल्यास शरीरात पचन झालेल्या अन्नाचे शोषण नीट न झाल्याने जीवनसत्त्वांचा अभाव निर्माण होतो.
- ही औषधे उष्ण व तीक्ष्ण असल्याने रक्ताबरोबर जेव्हा ती फिरतात तेव्हा उष्ण रक्ताचा परिणाम निश्चितच शरीरास जाणवतो.
- ही औषधे घेतल्यावर ताबडतोब दिसणारे दुष्परिणाम जसे पचनक्रिया बिघडणे, जुलाब, मळमळ, उलट्या, अॅलर्जिक रिअॅक्शन काही रुग्णामध्ये दिसतात.
- तोंड येणे, हार्मोन्सचे असंतुलन, पांडुता, यकृत, प्लीहेवर परिणाम, अस्थी व अस्थिमज्जेवरही विपरीत परिणाम होतो. डोळे लाल, कोरडे होणे, केस गळणे, विरळ होणे, शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊन वारंवार जंतुसंसर्ग होतो. हृदय, फुफ्फुसावरही उष्ण रक्ताचा कमी अधिक प्रमाणात विपरीत परिणाम होतो.
कोणत्या आजारांमध्ये अँटी-बायोटिक्स घेऊ नयेत -
ताप, सर्दी-खोकला ब्रॉंकायटिस, सायनस अशा अनेक आजारांमध्ये अँटी-बायोटिक (औषधे) घेण्याची गरज नसते. या समस्या अथवा आजार असताना अँटी-बायोटिकचा वापर करू नये. व्हायरल इन्फेक्शनसाठी देखील अँटी-बायोटिक्स प्रभावी ठरत नाहीत. अशा प्रकारचा संसर्ग झाल्यास अँटी-बायोटिक्समुळे खूप नुकसान होऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली.