कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरी केली जाते. एक थोर राजकारणी, तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक अशा महामानवाप्रती असणाऱ्या भावना त्यांच्या जयंतीदिनी प्रत्येक स्तरातून व्यक्त केल्या जातात. बरेचसे कलाकार आपल्या कलेतून बाबासाहेबांना अभिवादन करत असतात. अशाच पद्धतीने कोल्हापुरातल्या एका कलाकाराने फक्त बोटाच्या ठशावर बाबासाहेबांच्या चेहऱ्याचे चित्र काढून वेगळ्या पद्धतीने अभिवादन केले आहे.
advertisement
विवेक कांबळे असे या तरुण कलाकाराचे नाव असून तो कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावचा रहिवासी आहे. त्याला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असल्याने ती त्याने आजवर जोपासली आहे. महाविद्यालयीन काळात युवा महोत्सवामधून कला क्षेत्रात चित्रकला, नाट्य, नृत्य अश्या विविध कलाप्रकारांमध्ये अनेक बक्षिसे त्याने मिळवली आहेत. उदरनिर्वाहासाठी मायक्रोबायोलॉजी विषयाची पदवी प्राप्त करून तो सध्या श्री हनुमान सहकारी दूध संघ, यळगुड या ठिकाणी केमिस्टची नोकरी करत आहे. नोकरी करत असतानाच आर्ट टीचर डिप्लोमा कोर्सच्या माध्यमातून चित्रकलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देखील त्याने घेतले. तर आवडीमुळेच वेगळ्या पद्धतीने, बोटाच्या ठश्यामध्ये बाबासाहेबांच्या चेहऱ्याचे चित्र विवेकने साकारले आहे.
इथं घडले बाबासाहेब! आंबेडकरांची साताऱ्यातील शाळा पाहिली का? आजही घडतायेत विद्यार्थी, Video
कसे काढले चित्र ?
विवेकने आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्याचा विचार खूप आधीच केला होता. त्यामुळेच यंदा त्याने हे अनोख्या पद्धतीने करून दाखवले आहे. विवेकने त्याच्या एका बोटाचा ठसा पांढऱ्या कागदावर उमटवला. या 2 × 1 सेंटिमीटर आकाराच्या ठश्यामध्येच त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे मिनिएचर पोर्ट्रेट स्केच साकारले आहे. या कलाप्रकाराला फिंगर प्रिंट मिनिएचर स्केच असे म्हणतात. ठशांवर टोकदार ग्रेफाइट पेन्सिलचा वापर करून हे चित्र काढण्यात आले आहे. तर हे चित्र पूर्ण करायला साधारण तासाचा वेळ लागला असल्याचे देखील विवेकने सांगितले.
नोकरी करत काढली अनेक चित्रे
आपली नोकरी सांभाळत आपली आवड विवेकने चांगल्या पद्धतीने जपली आहे. याआधी अनेक उत्तमोत्तम चित्रे विवेकने काढलेली आहेत. त्यातच आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बोटाच्या ठश्यामध्ये मिनिएचर फिंगर प्रिंट स्केच काढले आहे. या चित्राच्या माध्यमातून त्याने बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना कलात्मक अभिवादन केले आहे.





