तिघं जण बारमध्ये आले अन्...
नायगाव येथील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री 11:30 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. गजानन नामदेव कासले (वय 42) असे या दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तिघं जण बारमध्ये आले होते आणि त्यांनी काही वस्तूंची मागणी केली. मात्र, ती मागणी पूर्ण न झाल्याने त्यांच्यात आणि मालकामध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे रूपांतर पुढे एका हिंसक हल्ल्यात झाले, ज्यामध्ये बार मालक कासले यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
वेटरला जबर मारहाण...
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी गजानन कासले यांच्या डोक्यात लाठ्या-काठ्यांनी निर्दयीपणे प्रहार केले गेले होते. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेला वेटर अजय मोरे हा देखील गंभीर जखमी झाला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी दुकानातील 10 ते 15 हजार रुपये रोख आणि दारूच्या बाटल्या घेऊन तेथून पळ काढला. या थरारक घटनेचे दृश्य सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाले आहे.
अवघ्या 5 तासांत आरोपींना अटक
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 5 तासांत लोहा तालुक्यातून मारोती उर्फ बबलु बोयणे, सागर बोयणे आणि संतोष तेलंगे या तिघांना ताब्यात घेतले. बालाजी कासले यांच्या तक्रारीवरून या आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
