मनोज जरांगेंच्या आंदोलनावर भाष्य करताना लक्ष्मण हाके म्हणाले की, "आताच्या आता मनोज जरांगेंना मुंबईच्या बाहेर काढावं. मनोज जरांगेंच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो. त्यांना सलाईन लावा. त्यांना खाऊ पिऊ घाला. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. पण अशी आडमुठी भूमिका घेऊन ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करू नका. गावगाड्यात ५०-६० टक्के ओबीसी आहेत. त्यांनाही मतांचा अधिकार आहे."
advertisement
"मुख्यमंत्रीसाहेब, तुम्हाला जर या दहा टक्के मतांची काळजी असेल तर, आमच्याकडे ५०-६० टक्के मतं आहेत. यांना पंचायत राजमधील आरक्षण घ्यायचं असेल तर त्यांना ते आरक्षण घेऊ द्या. पण तुमच्या आमदारकी खासदारकीचा मार्ग आमच्या वाड्यावरून, तांड्यावरून आणि वस्त्यांवरून जातो. त्यामुळे तुम्हाला राजकारणाची, बॅलेटची भाषा कळत असेल, तुम्हाला तुमचा पक्ष वाढवायचा असेल तर, राजकारण वाचवायचं असेल, तर आम्ही ओबीसी बांधवही बॅलेटमधून उत्तर देऊ", असं लक्ष्मण हाके म्हणाले.
बारामतीत मोर्चा काढणार
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले, "येत्या पाच सहा दिवसांत आम्ही बारामतीत मोर्चा काढू. ज्या बारामतीकरांनी मराठवाड्यात जाऊन जरांगेला मोठा केला. सपोर्ट केला. बेकायदा मागण्यांना पाठबळ दिलं. त्याच बारामतीकरांच्या मातृभूमीमध्ये आम्ही आंदोलन करू. बारामतीमध्ये ओबीसी नाही, असं त्यांना म्हणायचं आहे का? ज्या ओबीसींच्या मतांवर अजित पवार विधानसभेत गेले, त्यांच्या हक्कांवर अजित पवार एक शब्दही बोलायला तयार नाहीत. तुम्ही सत्तेमध्ये बसता, तुमचेच आमदार जरांगेंना पाठिंबा देतात, पैसे पुरवतात. त्यांच्याबद्दलही तुम्ही काहीच भूमिका घेत नाही, त्यामुळे आम्ही बारामतीत आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. लवकरच तारीख आणि वेळ जाहीर करू. बारामतीत ५ लाख लोकांचा मोर्च घेऊन जाऊ, पवारांच्या घरावर घेऊन जाऊ, एवढं मी निश्चित सांगतो."