विदर्भ-मराठवाड्यात पावसाने थोडी उसंत घेतली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. मात्र काही ठिकाणी ढगाळ हवामान राहू शकतं. तर डोंगर भागात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. पुढचे ४८ तास तरी या दोन्ही विभागांसाठी कोणताही अलर्ट नसेल. अचानक पावसाने दडी मारल्यामुळे उष्णता वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
पालघर, रायगड, नवी मुंबई, नंदुरबार, नाशिक, पुणे आणि घाटमाथ्यावर आज अति मुसळधार ते मुसळधार पाऊस होईल. वादळी वाऱ्यासह या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, जळगाव, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबईसह उपनगर या भागांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
ताशी 40 किमी वेगाने वारे वाहतील आणि त्यासोबत मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आज आणि उद्या या जिल्ह्यांमध्ये एकसारखी परिस्थिती असेल. हवामान विभागाच्या या भागातील नागरिकांनी अलर्टनुसार, आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे त्यामुळे नागरिकांनी जास्त काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.