महाविद्यालयीन जीवनात राष्ट्र सेवा दलाशी संपर्क आल्यानंतर ते काँग्रेसकडे आकृष्ट झाले. आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्धच्या आंदोलनात त्यांनी सक्रीयपणे सहभाग नोंदवला. महाविद्यालयीन निवडणुकांच्या माध्यमातून ते राजकीय क्षेत्रात आले. सहकारी तत्त्वावर अकोले तालुक्यातील राजूर येथे त्यांनी पहिली दूध संस्था काढली. पहिल्या दिवशी २५ ते ३० लिटर दुधाचे संकलन झाले. पुढे हाच धंदा तालुक्याचा प्रमुख व्यवसाय बनला. आजच्या घडीला तालुक्यात २ लाख लीटर दूधाचे संकलन होते, याचे सर्वस्वी श्रेय पिचड यांच्या दूरदृष्टीला जाते.
advertisement
शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या बरोबरच मधुकर पिचड देखील बाहेर पडले. राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी पिचड एक होते. याचीच जाणीव ठेवून शरद पवार यांनी पिचड यांना प्रदेशाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. एका आदिवासी समाजाच्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद देऊन पवार यांनी सोशल इंजिनिअरिंग साधले. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीच्या राजकारणातही झाला. पिचड यांनीही मिळालेल्या संधीचे सोने केले. राज्यातल्या जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन त्यांनी पक्षसंघटन वाढवले. पक्षातील चांगल्या तरुणांना संधी दिली. निवडणुकीच्या राजकारणात आणले. यातूनच शरद पवार यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख पिचड यांना मिळत गेली.
मधुकरराव पिचड यांचा राजकीय प्रवास –
-अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून १९७२ ला निवड
-१९७२ ते १९८० पंचायत समितीवर सभापती म्हणून निवड
-१९८० पासून २००९ पर्यन्त सलग ७ वेळेस आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले
-१९९५ ते जुलै १९९९ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळली होती.
-राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही पिचड यांनी धुरा सांभाळली होती
-मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिलाय.
-राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत होते, २०१४ ला अकोले मतदार संघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले
-२०१९ ला पिचड यांनी आपल्या मुलासह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटावर पराभव झाला.
-मधुकर पिचड यांनी १९६१ मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली
-मधुकर पिचड यांनी १९९३ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला
-आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, पशु विकास संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडलीये