नेमकं प्रकरण काय?
गेल्या महिन्यात, २ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रात नगर पालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडले. महाडमध्ये मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक दोनमध्ये मोठा राडा झाला होता. यावेळी शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. या राड्यादरम्यान विकास गोगावले यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता. तसेच रिव्हॉल्व्हर रोखल्याचा देखील आरोप करण्यात आला होता.
advertisement
या घटनेनंतर महाड पोलिसांनी विकास गोगावले यांच्यावर कलम ३०७ (जीवे मारण्याचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून विकास गोगावले फरार होते. कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांनी पोलिसांत हजर होऊन जामीन मिळवणे अपेक्षित होते, मात्र ते अनेक दिवस फरार राहिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.
दरम्यान, गुरुवारी हायकोर्टाने प्रशासनाला झापलं. एक मुख्यमंत्री इतका हातबल कसा काय झाला? एका मंत्र्याच्या मुलाला अटक करू शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं होतं. यानंतर शुक्रवारी सकाळी विकास गोगावले महाड शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या प्रकरणात विकास गोगावले यांनी आपली बाजू मांडताना दावा केला होता की, सुशील झांबरे यांनीच त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखली होती. मात्र, महायुतीमधील दोन मित्रपक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर ठाकल्याने महाडमधील वातावरण चांगलेच तापले होते. आता विकास गोगावले यांच्यावर पुढे काय कारवाई होणार? हे पाहणं महत्त्वाचं असेल.
