गेल्या काही दिवसांपासून हिंदू संघटनांकडून छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी तीव्र झाली आहे. सोमवारी सकाळी विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पुतळ्याजवळ निदर्शने केली. या आंदोलनात मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या काही ओळी जाळण्यात आल्याचे चर्चा सगळीकडे पसरली. त्यानंतर दुपारी या आंदोलनाविरोधात मुस्लिम समुदायाकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणल. मात्र, संध्याकाळी दोन्ही गट अचानक एकमेकांसमोर आले आणि दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली, दगडफेक झाली. शांत असणाऱ्या नागपुरात हिंसाचाराचा भडका उडाला. या भडक्यानंतर पोलिसांनी काही भागात संचार बंदी लागू केली आहे. तर, दुसरीकडे नागपूर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे.
advertisement
महाराष्ट्र एटीएसची एन्ट्री
दहशतवाद विरोधी पथकाने नागपूरात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने असामाजिक तत्व काही वर्षांपूर्वी दगडफेक करायचे, त्याच प्रकारची दगडफेक नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर ही घटना घडली होती. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी दहशतवाद विरोधी पथकाने सुरू केली आहे. हिंसाचाराच्या वेळी पेट्रोल बॉम्बचा वापर करण्यात आला. हा हल्ला सुनियोजित असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केले होते. या प्रकरणात कोणी आर्थिक मदत केली आहे का याचा सुद्धा तपास नागपूर पोलीस आणि दहशतवादी पथक करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विविध भागात जमावबंदी
हिंसाचारानंतर कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याठिकाणी वैद्यकीय कारण वगळून इतर कारणासाठी घराबाहेर पडण्यास मनाई आहे.
