नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत राज्यातील विविध महापालिकांना विविध प्रकल्प पूर्ण करण्याकरिता स्वहिश्याचा निधी उभारण्याकरिता हुडकोकडून २००० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
संभाजीनगरसाठी ८२२ कोटी २२ लाख रुपये
या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी ८२२ कोटी २२ लाख रुपये, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चार मलनिस्सारण प्रकल्पासाठी २६८ कोटी ८४ लाख रुपये, मीरा भायंदर महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ११६ कोटी २८ लाख रुपयांचे कर्ज उभारणी करता येणार आहे.
advertisement
राज्यातील विविध महापालिका क्षेत्रात केंद्र पुरस्कृत अमृत २.० अभियान, स्वच्छ भारत अभियान २.०, महाराष्ठ्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान व इतर केंद्र व राज्य स्तरावरील पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. हे प्रकल्प निधी अभावी निधी रखडू नयेत व वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना व त्यातून निधी उभारण्याची कार्यपद्धती निश्चित करून देण्यात आली आहे. त्यानुसार या महापालिकांना व इतरही महापालिकांना स्वहिश्शाचा निधी उभारता यावा यासाठी पहिल्या टप्प्यात हुडकोकडून दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली.
संभाजीनगरचा पाणी प्रश्न, जनतेत प्रचंड रोष
राज्याची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर शहराची ओळख आहे. पण याच पर्यटन राजधानीतल्या नळांना १५-१५ दिवस पाणी येत नाही हे सांगितले तर कुणाला खरे वाटणार नाही. पण गेली काही वर्षे संभाजीनगरमध्ये हीच परिस्थिती आहे. पाणी प्रश्नावरून जनतेत मोठा रोष आहे. दोन तीन वेळा शिवसेना पक्षाने महापालिकेविरोधात हंडा मोर्चेही काढले. हाच रोष निवडणुकीत आपल्याविरोधात जाऊ नये याची राज्य शासनाने घेतली आहे.