विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्ह्यांतून समृद्धी महामार्ग जातो. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर २०२२ रोजी पार पडले. दुसऱ्या टप्याचे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी (कोकमठाण) ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर इंटरचेंज दरम्यान एकुण ८० कि.मी लांबीचे लोकार्पण मे २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तर समृद्धी महामार्गाच्या भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी पर्यंतच्या २५ किमीच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण २०२४ रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले होते. एकूण ७०१ किलोमीटर पैकी ६२५ कि.मी लांबीचा हा महामार्ग सध्या वाहतुकीस सुरु होता. आता, समृद्धी महामार्गाची उर्वरित ७६ कि. मी लांबीचे (इगतपुरी ते आमणे) लोकार्पण आज ०५ जून २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.
advertisement
१० जिल्हे प्रत्यक्ष,१४ जिल्हे अप्रत्यक्ष जोडले गेले, आता नागपूर मुंबई आठ तासांत
राज्याच्या पाच महसुल विभागाच्या १० जिल्ह्यातील २६ तालुक्यांमधील ३९२ गावांमधुन जाणारा हा सहा पदरी महामार्ग ग्रीन फिल्ड संरेखन आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि ठाणे हे 10 जिल्हे प्रत्यक्षरीत्या जोडले जातात. तसेच समृद्धी महामार्गामुळे चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड हे 14 जिल्हे अप्रत्यक्षरीत्या जोडले जातात. जुन्या नागपूर मुंबई मार्गावरुन नागपूरहून मुंबईकडे येण्यास 17-18 तास लागतात. नवीन “ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे” ने प्रवास 8 तासात करणे शक्य होणार आहे. आता मुंबईतील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट ते नागपूरस्थित मिहान यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे बंदरावरुन जलद वाहतूक करुन आवश्यक माल भारतभर वेळेवर पोहोचवणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प देशांतर्गंत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागास महत्वाचा ठरलेला आहे.
हा महामार्ग दिल्ली- मुंबई द्रुतगती मार्ग, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि शिर्डी, अजिंठा – वेरुळ लेणी, लोणार सरोवर आणि इतर पर्यटन स्थळांना जोडणारा आहे. देशाचे ग्रोथ इंजिन असणाऱ्या महाराष्ट्रासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ही खऱ्या अर्थाने समृद्धीची भाग्यरेषा ठरणार आहे.
समृद्धीवर महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबी आणि रुंदीचा बोगदा
समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्यातील ७६ किलोमीटर लांबी ही नाशिक आणि ठाणे या दोन जिल्ह्यात येते. सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अभियांत्रिकी आव्हान पेलले. या टप्प्यामध्ये एकूण ५ दुहेरी बोगदे असून या बोगद्यांची लांबी १०.७३ किलो मीटर (दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी २१.४६ किलोमीटर) आहे. त्यातील पॅकेज १४ (इगतपुरी) येथील बोगदा ८ किलोमीटर लांबीचा असून हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबी आणि रुंदीचा (१७.६१ मीटर) बोगदा आहे.या बोगद्याची उंची 9.12 मीटर आहे.
प्रथमच बोगद्यात वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा
अग्निसुरक्षेसाठी भारतातील कोणत्याही बोगद्यात प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा इगतपुरीमधील सर्वात लांबीच्या बोगद्यामध्ये बसविण्यात आलेली आहे. या बोगद्यामुळे अंदाजे आठ मिनिटात इगतपुरी ते कसारा हे अंतर पार करता येणार आहे. त्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र.३ नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. त्यामुळे वाहतूक अधिक जलद होणार आहे. कसारा घाटातील वाहतूक अधिक गतिमान होण्यासही त्यामुळे सहाय्य होणार आहे.
सर्वाधिक लांबीचा पूल
भौगालिक परिस्थितीतून मार्ग काढत महामार्गाचे काम पुढे नेत असताना नाशिक आणि ठाणे या जिल्ह्यातील ७६ किमीच्या डोंगर दऱ्यांमुळे व्हायाडक्ट (मोठे पूल) आणि बोगदे बांधणे हे मोठे जिकीरीचे होते. काही ठिकाणी कठीण खडकात ३० ते ४० मीटरपर्यंत खोदकाम करावे लागले. या टप्प्यात एकूण १७ व्हायाडक्ट (मोठे व्हॅली पूल) असून त्याची एकूण लांबी १०.५६ कि.मी (दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी २१.१२ कि.मी) आहे. या टप्प्यात सर्वाधिक लांबीचा पूल (व्हायाडक्ट) २.२८ किलोमीटर लांबीचा आहे. या टप्प्यात एका ठिकाणी (व्हायाडक्ट-२) पुलाच्या काही खाबांची उंची 84 मीटरपर्यत आहे.
इंटरचेंजेस
या टप्प्यात इगतपुरी, खुटघर व आमणे येथे इंटरचेंज येतात. या शेवटच्या टप्यात मोठ्या प्रमाणात विद्युत उच्च तसेच कमी दाबाच्या विद्युत वाहिन्या स्थलांतरित कराव्या लागल्या. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या कमी दाबाच्या 62 वाहिन्या स्थंलातरित करण्यात आलेल्या आहेत. तसेच, टोरेंट पॉवरच्या ५ विद्युत वाहिन्या आणि पॉवर ग्रीडची 1 विद्युत वाहिनी स्थलांतरित करण्यात आलेली आहे. तसेच, या टप्प्यात 1 रेल्वे ओलांडणी पुल बांधण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांना आपला शेतमाल मोठ्या बाजारपर्यंत पोहोचवता येणार, मुंबईहून शिर्डीला ४ तासांत जाता येणार
इगतपुरी ते आमणे (ता. भिवंडी) हा 76 किमीचा टप्पा वाहतुकीस सुरु झाल्यानंतर ठाणे (आमणे) व नागपूर पर्यंतचा प्रवास आठ तासात करणे सहजतेने शक्य होणार आहे. तसेच ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांनाही या महामार्गामुळे आपला प्रवास सुलभरित्या व जलदपणे करणे शक्य होणार आहे. त्यासोबतच शिर्डी, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल सुलभतेने कमी कालावधीत मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवता येणार आहे. शेतकरी, उद्योजक, प्रवाश्यांना मुंबई महानगर प्रदेशात कामानिमित्त वरचवेर येणे जाणे हे अधिक सोयीस्कर होणार असून शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक संधीचे क्षेत्र विस्तारण्याच्या दृष्टीनेही हा महामार्ग निश्चितच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहाय्यक ठरणारा आहे.
राज्याच्या उपराजधानीला राज्याच्या राजधानीपर्यंत जोडणारा नागपूर ते मुंबई दरम्यानचे अंतर अवघ्या आठ तासांवर आणणारा समृद्धी महामार्ग निश्चित महाराष्ट्राच्या औद्यागिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासालाही गतिमान करणारा ठरेल, यात शंका नाही.