नांदेडमधील सक्षम ताटे या तरुणाचे आंचल नावाच्या तरुणीवर प्रेम होते. दोघांनीही लग्न करण्याचे ठरविले होते. हे प्रेमसंबंध कळल्यावर मुलीच्या वडिलांनी आणि भावाने सक्षम ताटे यास आंचलपासून दूर रहा, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघेही लग्न करण्यावर ठाम होते. त्यामुळे संतापलेल्या मामीडवार कुटुंबाने सक्षमचा निर्घृण खून केला.
आंचलची पहिली मागणी मान्य
advertisement
सक्षम ताटे याची 27 नोव्हेंबर रोजी हत्या करण्यात आली. या प्रकरणी आंचलचे वडील, दोन्ही भाऊ आणि अन्य तीन आरोपी अटक आहेत तर या प्रकरणातील दोघे आरोपी फरार आहेत. तिघेही आरोपी पोलीस कोठडीत असून पोलीस प्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत. दरम्यान, सक्षमच्या कुटुंबांला धोका असून सुरक्षा देण्याची मागणी आंचलने केली होती. शिवाय विविध संघटनानी देखील सक्षमच्या कुटुंबियांकरिता पोलीस सुरक्षेची मागणी केली होती. त्यानुसार आंचल आणि सक्षमच्या कुटुंबाला पोलिसांनी सुरक्षा दिली. 24 तास दोन कर्मचारी सक्षमच्या घरापुढे तैनात करण्यात आले आहेत.
नांदेडमधील सक्षम ताटे हत्या प्रकरण नेमके काय?
नांदेडच्या इतवारा परिसरात सक्षम ताटे या बौद्ध तरुणाची प्रेम प्रकरणातून अमानुषपणे हत्या करण्यात आली. सक्षमच्या जातीमुळे मुलीच्या कुटुंबियांचा प्रेम प्रकरणाला आणि त्यांच्या लग्नाला विरोध होता. जातीय विद्वेषातून सक्षम ताटे याची हत्या करण्यात आली होती. प्रियकर सक्षमच्या हत्येनंतर आंचल मामीडवार हिने त्याच्या मृतदेहासोबत लग्न करून आपले प्रेम व्यक्त केले. सक्षम आज या जगात नाही पण मरूनही तो जिंकला आहे. त्याच्या हत्या प्रकरणातील आरोपी माझे कुटुंबीय यांना कठोरातील कठोर शिक्षा सुनवा, अशी मागणी आंचलने केली आहे. केवळ जातीमुळे आम्हाला लग्नाची परवानगी दिली गेली नाही आणि जातीमुळेच त्याचा खून झाला, असे आंचल म्हणाली.
सक्षम ताटे याचे आंचलशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, जात वेगळी असल्यामुळे आंचलच्या कुटुंबीयांचा या दोघांच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. याच वादातून आचलचे वडील गजानन मामीडवार, भाऊ साहिल मामीडवार आणि हिमेश मामीडवार या तिघांनी गोळ्या घालून आणि फरशीचे तुकडे डोक्यात घालून त्याचा खून केला. गुरुवारी हे सगळे प्रकरण समोर आले. पोलिसांनी सक्षमविरोधात माझ्या भावाला भडकवले, असा आरोप आंचलने केला आहे.
