निवडणूक खरंतर ही लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असतो. लोकशाहीच्या ह्या उत्सवामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग असावा यासाठी राज्य सरकारकडून सर्वच कर्मचार्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही भर पगारी सुट्टी असून प्रत्येक नोकरदार वर्गाला त्या दिवसाचा पगार मिळणार आहे. लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या कलम 135 (ब) नुसार, मतदानाच्या दिवशी सर्वच कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता येता यावा यासाठी त्या दिवशी भर पगारी सुट्टी किंवा कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. जर एखादी खासगी कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला मतदानासाठी सुट्टी किंवा वेळेमध्ये सवलत देण्यास नकार देत असेल, तर अशा कंपनीविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
advertisement
गेल्या काही निवडणुकींमध्ये काही संस्था/ आस्थापना त्यांच्या कामगारांना मतदानाची भर पगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत असे आढळून आले आहे. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहवे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, कल्याण- डोंबिवली महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांसह 29 महानगर पालिकेंतील कर्मचाऱ्यांना म्हणजेच मतदारांना भर पगारी सुट्टीची सवलत मिळणार आहे. आणि ज्या कार्यालयांना सुट्टी देणं शक्य नाही, अशा कार्यालयांतील कर्मचार्यांना 2 ते 3 तासांची सवलत देणं बंधनकारक असेल.
