महायुतीमध्ये भाजप 3 जागांवर लढणार असून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना प्रत्येकी एक जागा सोडण्यात आली आहे. अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
विधानपरिषदेचे सदस्य असलेले आमश्या पाडवी, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि राजेश विटेकर हे विधानसभेवर निवडून गेल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी येत्या 27 मार्च रोजी सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे संकेत आहेत.
advertisement
राष्ट्रवादीकडून कोणाला संधी?
राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांना संधी देण्यात आली आहे. संजय खोडके हे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जातात. संजय खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके या अमरावती मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यामुळे आता विधीमंडळात पती-पत्नी एकत्र दिसणार आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर संजय घोडके यांनी त्यांना साथ दिली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटकर यांच्या जागी खोडके यांना संधी मिळणार आहे. या जागेसाठी झिशान सिद्दिकी यांच्या नावाची चर्चा सुरू होती.
राजेश विटेकर यांच्या रिक्त जागेवर मराठा समाजाच्या उमेदवाराला संधी द्यावी असा आग्रह पक्षातील मराठा कार्यकर्त्यांनी केला होता. त्यासाठी अजित पवारांना हजारोंच्या संख्येने पत्र पाठवण्यात आली होती. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाकडून कोणाला संधी मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
भाजपकडून कोणाला संधी?
महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. भाजपकडे विधान परिषद निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक होते. भाजपने आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. संदीप जोशी, संजय केणेकर, दादाराव केचे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे.
