महायुतीकडे प्रचंड बहुमत असल्याने या पाचही जागांवर त्यांचे उमेदवार विजयी होण्याइतके संख्याबळ आहे. महायुतीमध्ये भाजप 3 जागांवर लढणार असून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना प्रत्येकी एक जागा सोडण्यात आली आहे.
कोणाच्या रिक्त जागांवर होणार विधान परिषदेची निवडणूक?
विधानपरिषदेचे सदस्य असलेले आमश्या पाडवी, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि राजेश विटेकर हे विधानसभेवर निवडून गेल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी येत्या 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. सोमवार, 17 मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
advertisement
भाजपकडून कोणाला उमेदवारी?
राज्यातील विधान परिषदेसाठी भाजपने संदीप जोशी, संजय केणेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
फडणवीसांचे बालमित्र होणार आमदार...
उमेदवारी जाहीर झालेले संदीप जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बालपणीचे मित्र आहेत. नागपूर महानगर पालिकेत 4 टर्म नगरसेवक राहिले आहेत. त्यांनी सत्तापक्ष नेता, स्थायी समिती अध्यक्ष, महापौरपद भूषविले आहे. संघटनेत विविध जवाबदारी संदीप जोशी यांनी सांभाळल्या आहेत. सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यात संदीप जोशी सक्रिय आहेत.
फडणवीसांच्या स्वीय सचिवांसाठी जागा सोडली, आता राजकीय पुनर्वसन...
दादाराव केचे हे आर्वी मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले आहेत. दादाराव हे केचे हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. दादाराव केचे यांचे तिकीट कापून सुमित वानखेडे याना आर्वी मधून संधी देण्यात आली होती. त्यावेळी नाराज झालेल्या केचे यांनी बंडखोरीचा झेंडा फडकावत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, थेट अमित शाह यांनी शब्द दिल्याने केचे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
विधानसभेसाठी इच्छुक पण परिषदेवर संधी...
तिसऱ्या जागेसाठी भाजपने छत्रपती संभाजीनगरमधील संजय केने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संजय केनेकर यांनी बूथ लेव्हलपासून पक्षासाठी काम करत विविध पदांपर्यंतची जबाबदारी पार पाडली आहे. संजय केनेकर यांनी भाजपच्या कामगार मोर्चाचे अध्यक्ष, भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे. औरंगाबाद पूर्वमधून निवडणूक लढण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. मात्र अतुल सावेंना उमेदवारी देण्यात आली. संजय केनेकर हे म्हाडाचे सभापती सुद्धा राहिले आहेत.
