मुंबई महापालिका
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजपच्या युतीसाठीच्या बैठका सुरू आहेत. अद्यापपर्यंत जागा वाटपाच्या अनुषंगाने तीन बैठका संपन्न झाल्या असल्या तरी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत नाहीये. शिंदेसेनेने मुंबईत किमान ८५ जागांची मागणी भाजपकडे केलेली आहे. त्यावर भाजपच्या नेतेमंडळींनी चर्चेतून मार्ग काढू, असे सांगत जागांमध्ये काटछाट होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. एकंदर जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे कळते.
advertisement
ठाणे महापालिका
भाजप आणि शिवसेना ठाणे महानगरपालिका निवडणुकीत युतीत लढणार असे दोन्ही पक्षांचे नेते वारंवार सांगत राहिले, त्यानुसार स्थानिक नेत्यांच्या बैठका देखील झाल्या. भाजपाने आपली जागांची मागणी तसेच अनेक गोष्टी बैठकांमध्ये स्पष्ट देखील केल्या. पण शिवसेनेकडून वेळ लागतोय, शिवसेनेकडून अंतिम प्रस्ताव आला नाहीये. त्यामुळे एबी फॉर्म वाटप आणि उमेदवारी अर्ज भरण्यास भाजप उमेदवारांना अवघड होतंय, असे भाजपाचे संभाव्य उमेदवार सांगतायेत. त्यामुळे खरंच ठाण्यात युतीचं घोडं शिवसेनेमुळं अडलंय का? हे कळायला मार्ग नाही.
कल्याण डोंबिवली
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सुरुवातीला स्वबळावर लढण्यासाठी स्थानिक भाजप नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू होते. मात्र वरिष्ठ स्तरावर युतीमध्ये निवडणुका लढविण्याचा विचार झाल्यानंतर आता जागा वाटपाच्या अनुषंगाने चर्चेच्या दोन ते तीन फेऱ्या पार पडल्या आहेत. पुढच्या ४८ तासांत जागा वाटपाचे सूत्र जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिका
पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना युतीमधून बाहेर पडणार का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपकडून सन्मानजनक जागांची शिवसेनेला अपेक्षा आहेत. सुरुवातीला ३० ते ३५ जागांची मागणी केलेल्या शिवसेनेला अजिबातच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर किमान २५ जागा तरी द्या, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. तरीही भाजपने नकारात्मक सूर दर्शविल्याने आता शिवसेना युती तोडण्याच्या विचारात असल्याचे कळते. भाजपकडून योग्य उत्तर आले नाही तर अंतिम निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
नाशिक महापालिका
१२१ जागांसाठी होत असलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ४५ ते ५० जागा देण्यात याव्यात, अशी मागणी पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे केल्याची माहिती आहे. त्यावर निवडून येण्याच्या मेरिटनुसार जागा देण्यात येतील, असे गिरीश महाजन यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रवादीचे नेते मंत्री झिरवाळ यांनी तर जागा वाटपाच्या चर्चेसाठी किमान १० मिनिटांची तरी वेळ द्या, अशी विनवणी गिरीश महाजन यांच्याकडे केली. यावरून नाशिकमध्ये भाजप सेना आणि राष्ट्रवादी अगदी कमी जागांमध्ये गुंडाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु जर सन्माजनक जागा मिळाल्या नाहीत तर आम्ही स्वबळावर लढू, असा इशारा शिंदे सेनेने दिला आहे.
नवी मुंबई महापालिका
नवी मुंबईत युतीची चर्चा फिसकटली असून युती होण्याची आशा मावळली असल्याचे कळते. दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे इच्छुकांनी संकेत दिले आहेत. नवी मुंबईच्या जागा वाटपात शिवसेनेकडून ५७ जागा मागण्यात आल्या होत्या. भाजपकडून बैठकीत १११ पैकी ९१ जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला. बैठकीत जागा वाटपाच्या मागणीवरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये तू तू मैं मैं झाली. माजी नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाल्याने चर्चेचं भिजत घोंगडं आहे.
