एका जागेसाठी पाच दावेदार, ठाकरेंची डोकेदुखी वाढली?
विद्यमान खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह पक्षाचे अनुभवी नेते आणि माजी खासदारांनी या शर्यतीत उडी घेतली आहे. राजन विचारे यांचे नाव चर्चेत आले आहे. ठाणे जिल्ह्यात ढासळलेली संघटनेची पकड पुन्हा मजबूत करण्यासाठी विचारे यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ठाण्यातील जवळपास सगळेच लोकप्रतिनिधी शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतरही राजन विचारे हे ठाकरे यांच्यासोबत राहिले.
advertisement
चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या नावाचीदेखील चर्चा सुऱी आहे. छत्रपती संभाजीनगर हा एकेकाळी ठाकरेंचा बालेकिल्ला होता, मात्र आता तिथे शिंदे गट आणि भाजपचे वर्चस्व वाढले आहे. ही ताकद पुन्हा मिळवण्यासाठी हे दोन्ही नेते इच्छुक आहेत. चंद्रकांत खैरे हे लोकसभेचे माजी खासदार आहेत. मागील दोन लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला. तर, अंबादास दानवे हे विधान परिषदेतून कार्यकाळ संपल्याने निवृत्त झाले आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे माजी खासदार विनायक राऊत हे देखील राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे. राऊत यांचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते नारायण राणे यांनी पराभव केला.
प्रियंका चतुर्वेदी यांचा राज्यसभेतील कार्यकाळ आता संपुष्टात येत आहे.दिल्लीच्या राजकारणात पक्षाची बाजू खंबीरपणे मांडणाऱ्या चतुर्वेदी यांना पुन्हा संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
शरद पवारांच्या नावाने समीकरणे बदलणार?
एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत स्पर्धा सुरू असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून शरद पवार यांना उमेदवारी मिळावी यासाठी हालचाली सुरू आहेत. महाविकास आघाडीत ही एकच जागा निवडून येण्याची शक्यता आहे.तर, दुसरीकडे काँग्रेसनेदेखील आपला दावा पुढं केला आहे. राज्यातील आघाडीच्या राजकारणात काँग्रेसने नेहमी सहकार्य करत नमती भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता राज्यसभेची ही जागा आम्हाला द्यावी अशी भूमिका घेतली आहे.
