रात्री २.२५ वाजता काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री २.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. एक स्विफ्ट डिझायर कार माजलगावकडून परभणीच्या दिशेने जात असताना छोटेवाडी फाट्याजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. वेग जास्त असल्याने कार रस्त्यावरून घसरली आणि तिने एकापाठोपाठ एक अशा चार ते पाच पलट्या घेतल्या. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
advertisement
हॉस्पिटल कर्मचारी निवृत्ती खेडेकर यांचा मृत्यू
या दुर्दैवी अपघातात निवृत्ती भाऊसाहेब खेडेकर (वय २५ वर्ष) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. निवृत्ती हा मूळचा परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सिराळा गावचा रहिवासी होता. तो माजलगाव येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होता. त्यांच्या निधनामुळे हॉस्पिटल कर्मचारी आणि त्यांच्या मूळ गावात शोककळा पसरली आहे.
जखमीची प्रकृती चिंताजनक
अपघातात आणखी एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
