सिंधुदुर्ग : मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानं राज्यभरात शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, बुधवारी राजकोट किल्ल्यावर राजकीय राडा बघायला मिळाला. भाजप नेते खासदार नारायण राणे, निलेश राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आमने-सामने आल्यानं मोठा राडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही बाजूच्या ४२ कार्यकर्त्यांसह शेकडो अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे. कलम 121 (2), 189 (2), 191(2), 190 118 (2), 223, 3, 37 (1) 37 (3) नुसार गुन्हे दाखल झाला असल्याची माहिती समोर आलीय.
advertisement
मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकोट किल्ल्यावर तीव्र आंदोलन पाहायला मिळालं. मविआचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आज आंदोलन करत असताना एकमेकांसमोर आले. मविआ विरुद्ध भाजप कार्यकर्ते भिडले. त्यांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र तिथेही पोलिसांच्या अंगावर कार्यकर्ते धावून आले.
शिवरायांचा पुतळा राहिला बाजूला मात्र त्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज्यात राजकारण सुरू झालं आहे. हा राडा नेमका कशासाठी चाललाय असा प्रश्न आता पडू लागला आहे. राजेंचा पुतळा पुन्हा उभा कसा राहील, त्यातल्या त्रूटी नेमक्या काय होत्या या ऐवजी आता प्रत्येक नेता-कार्यकर्ता एकमेकांवर टीका आणि राजकारण करण्यात व्यस्त आहे.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी आता फॉरेन्सिक टीम राजकोट किल्ल्यावर दाखल झाली आहे. कोल्हापूर इथून फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे. सिंधुदुर्गातील फॉरेन्सिक टीम नंतर आता कोल्हापूर येथील फॉरेन्सिक टीम घटनास्थळाची पाहणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर किल्ल्यावर इतरांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
