नेमकी घटना काय?
मृताच्या पत्नीने दिलेल्या जबाबानुसार, २१ फेब्रुवारी रोजी गणेश केंद्रे या संशयितानं तिचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर पीडितेच्या पतीने त्याच दिवशी जळकोट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही पोलिसांनी FIR दाखल केला नाही. उलट, गुन्हा दाखल करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप पीडितेनं केला आहे.
advertisement
हातावर नाव लिहून केली आत्महत्या
एकीकडे पोलीस सहकार्य करत नव्हते, तर दुसरीकडे आरोपी तुळशीदास केंद्रे, गणेश केंद्रे आणि शिवाजी केंद्रे हे तक्रार मागे घेण्यासाठी सतत धमकावत होते. "तक्रार मागे घे नाहीतर जिवे मारू," अशा धमक्यांमुळे पीडित शेतकरी पती प्रचंड मानसिक तणावाखाली होते. अखेर ६ एप्रिल रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांनी विष प्राशन केलं. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या हातावर आरोपींची नावं लिहिली आहेत.
हातावरील चिठ्ठीत काय लिहिलं?
तुळशीदास गणपती केंद्रे, गणेश तुळशीदास केंद्रे, शिवाजी रामदास केंद्रे, तुळशीदासचा जावई, मेहुणा हे चौघे जण मला धमकी देत आहेत. मी कागद लिहून माझ्या खिशात ठेवला आहे
पोलिसांवरही गुन्हा दाखल
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर आता जळकोट पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तुळशीदास गणपती केंद्रे, गणेश तुळशीदास केंद्रे, त्यांचा जावई आणि मेहुणा यांच्यासह पोलीस कर्मचारी शिवाजी रामदास केंद्रे आणि माणिक संताराम कसबे अशा एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.
