ही सामूहिक अत्याचाराची घटना घडताच पीडित महिलेनं तातडीने धुळे तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेच्या मुख्य आरोपीसह त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय पीडित महिला गुजरातच्या सुरत येथे आपल्या पतीसोबत राहायला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ओळख राहुल सुखराज कोळी (रा. जापी, ता. धुळे) याच्यासोबत झाली होती. ओळखीतून दोघांमध्ये बोलणे वाढले आणि या ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमसंबंधात झाले. या संबंधाचा फायदा घेत आरोपी राहुल कोळी याने महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखवले.
advertisement
या आमिषाला बळी पडून पीडित महिला जवळपास २५० किलोमीटरचा प्रवास करून सुरतहून धुळ्यात आली. धुळ्यात आल्यानंतर राहुल कोळी याने तिला एका ठिकाणी थांबवले आणि तिथे त्याने आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेत घडलेला प्रकार सांगितला.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून धुळे तालुका पोलिसांनी तत्काळ कारवाई करत राहुल सुखराज कोळी आणि त्याला मदत करणाऱ्या त्याच्या मित्रांविरुद्ध सामूहिक अत्याचारासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर घटनेमुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत.