प्रकाश सहस्त्रबुद्धे असं मृत पावलेल्या ३१ वर्षीय पर्यटकाचं नाव आहे. तो पुण्यातील रहिवासी असून आपल्यासोबत अन्य तीन मित्रांना घेऊन काशीद बीच फिरायला गेला होता. पण मृत्यूच्या घटनेनं थर्टी फर्स्टच्या आनंदात विर्जन पडलं आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता प्रकाश आपले मित्र गणेश सहस्त्रबुद्धे, शदाब अविद मलिक आणि राकेश राजू पवार यांच्यासह काशीद बीचवर पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेला होता.
advertisement
बराच वेळ पोहून झाल्यानंतर चारही मित्रांना स्पोर्ट बाइक सफारीचा आनंद घ्यायचा होता. त्यामुळे प्रकाशचे सगळे मित्र पैसे आणण्यासाठी गेले. यावेळी प्रकाश मात्र पोहत राहिला. मित्र पैसे आणायला गेल्यानंतर प्रकाश पाण्यात बुडाला. पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे, मित्र निवांत होते. प्रकाश पोहून झाल्यावर पाण्याबाहेर आला असेल, असं त्यांना वाटलं. पण दीड तासानंतर प्रकाश पाण्यात तरंगत असताना दिसला.
ही घटना उघडकीस येताच पोलीस आणि लाइफ गार्डने पाण्यात उतरून त्याला बाहेर काढलं. पण तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याला तातडीने मुरूड रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार हरी मेंगाळ करत आहेत.