मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा गेल्या रविवारी 15 डिसेंबरला पार पडला होता.त्यावेळेस खातेवाटप झाले नव्हते. आता हे खातेवाटप शनिवारी पार पडले होते. या खातेवाटपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ कुठलंही खातं मिळालं नाही.त्यामुळे ते नाराज आहेत. या उलट अजित पवारांनी भुजबळ यांना डच्चू देऊन त्याच्याजागी माणिकराव कोकाटे यांना कृषिमंत्रीपद दिल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. त्यात आधीच खातं न मिळाल्याची नाराजी असताना आता पक्षाच्या नेत्यांच्या बॅनवर फोटो न छापल्याची घटना घडली आहे.
advertisement
त्याचं झालं असं की राज्याचे कृषिमंत्री पद मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर येत आहे. माणिकराव कोकाटे यांच्या स्वागताचे होर्डिंग यात चर्चेचा विषय ठरत आहे. कारण माणिकराव कोकाटे यांच्या होर्डिंगवरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ गायब झाले असून ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे फोटो होर्डिंग वर पाहायला मिळत आहे. तसेच त्यांचे कट्टर विरोधक सुहास कांदे यांचे फोटो देखील झळकले आहेत. त्यामुळे महायुतीचा मंत्र्यांचे होर्डिंग आणि त्यावर महाविकास आघाडीचा खासदाराचे फोटो सध्या नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात चांगलेच चर्चिले जात आहे.
दरम्यान नाशिकमध्ये पाऊल ठेवल्यानंतर न्यूज 18 लोकमतशी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे. अजित पवार यांच्यावर कोणीही टीका केली तर मी ती खपवून घेणार नाही असा इशारा नवनियुक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांचं नाव न घेता लगावला आहे.
