छत्रपती संभाजीनगर: माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना संपवण्यासाठी दोन कोटींची सुपारी दिल्याच्या आरोप प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. जरांगेंची सुपारी घेतल्याचा आरोप असलेल्या तीन आरोपी पैकी एकाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. कांचन साळवी असे या आरोपीचे नाव आहे. दोन महिन्यानंतर या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे.
advertisement
अमोल खुणे आणि दादा गरड यांच्यावर अडीच कोटींची सुपारी घेतल्याचा आरोप होता. तर यासाठी कांचन साळवी याने धनंजय मुंडे आणि दोन्ही आरोपींमध्ये मध्यस्थी केल्याचा आरोप होता. दरम्यान वकील धनंजय गव्हाड पाटील यांनी आरोपींच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात जामिनीसाठी अर्ज केला होता. ज्यात साळवी यांचा जामीन अर्ज मान्य करण्यात आला आहे. चार्जशीटमध्ये पुरावा आढळून न आल्याने कोर्टाने जामीन अर्ज मंजूर केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला मारण्यासाठी मुंडेंनी दोन कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला होता. या प्रकरणात अमोल खुणे, कांचन साळवी आणि दादा गरड या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. जरांगे पाटील यांनी दोन ऑडिओ क्लिपही सार्वजनिक केल्या होत्या, ज्यात एका क्लिपमध्ये धनंजय मुंडे एका आरोपीशी बोलत असल्याचा दावा केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. जरांगे पाटील यांना नार्को टेस्ट आणि सीबीआय चौकशीचे आव्हान दिले होते. जरांगे पाटील यांनी हे आव्हान स्वीकारत, आपलीही नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली होती. मनोज जरांगे यांनी या कटात आपली बदनामी करणे, थेट खून करणे किंवा औषध देऊन घातपात घडवणे असे तीन प्रकार असल्याचे सांगितले. या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
