सुपारी देण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी कांचन नावाच्या व्यक्तीचं नाव घेतलं आहे. ही व्यक्त धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता किंवा पीए असल्याचंही जरांगे यांनी म्हटलं आहे. याच कांचन नावाच्या व्यक्तीने दोन्ही आरोपींना हाताशी धरून आपल्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती दिली. हा खळबळजनक खुलासा करण्याआधी जरांगे यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.
advertisement
मनोज जरांगे नक्की काय म्हणाले?
आपल्याला मारण्यासाठी तीन प्रकारची योजना आखण्यात आली होती. यात बीडचा एक कार्यकर्ता किंवा पीए... हा पीए दोनपैकी एका आरोपीकडे गेला होता. तिथून याची सुरुवात झाली. पहिलं काम ठरलं होतं... खोट्या रेकॉर्डिंग बनवा, व्हिडीओ बनवा, ते द्या. पण त्यांना खरे आणि खोटे कसलेच व्हिडीओ मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी खूनच करून टाकायचा प्लॅन केला. मग गोळ्या देऊ... औषध देऊ... मग घातपात करू, असं ठरलं, अशी माहिती जरांगेंनी दिली.
काहीही असो तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी मी सगळी घाण कमी करणार आहे. अशा नीच अवलादी संपल्या पाहिजे. बीडचा कांचन नावाचा माणूस आहे. तो धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता किंवा पीए आहे. धनंजय मुंडे यांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचण्याचं काम केलं आहे. कांचन नावाच्या माणासाने दोन्ही आरोपींना हाताशी धरलं. या आरोपींना मला मारायचं सांगितलं असेल, ते तपासातून समोर येईल. मात्र कांचनने या पोरांना परळीला नेलं. तेव्हा रेस्ट हाऊसमध्ये एक मोठी बैठक सुरू होती, हा आलेला समजलं की धनंजय मुंडेंनी बैठक सोडली आणि २० मिनिटात इकडे आले. तिथे एक आरोपी नेला होता. तिथे दुसरा आधीपासून होता.
इकडे आल्यानंतर त्यांचा दोन कोटींमध्ये सौदा झाला. त्यात ५० लाख अधिक देण्याचं ठरलं. याआधीही त्यांनी यासाठी पाच ते सहा कोटी रुपये नासवले आहेत. इथून घातपाताचा प्लॅन सुरू झाला. धनंजय मुंडे प्रत्यक्षात या दोन आरोपींना भेटला आहे. त्यांनीच हे करायला सांगितलं आहे. हेही आरोपींना माहीत आहे. याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
