TRENDING:

600 आदिवासी महिलांना मिळाला रोजगार, मेळघाटमध्ये रानआवळ्यापासून कसा बनवला जातोय च्यवनप्राश? Video

Last Updated:

हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप तसेच वातविकारांवर उपयुक्त ठरणाऱ्या रानआवळ्यापासून पहिल्यांदाच मेळघाटात च्यवनप्राश निर्मितीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये घनदाट जंगलात नैसर्गिकरित्या उगवणारा रानआवळा भरपूर प्रमाणात आहे. आता तो रानआवळा केवळ जंगलातील फळ न राहता आरोग्यसंवर्धन आणि आदिवासी महिलांच्या रोजगाराचा मजबूत आधार ठरत आहे. हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप तसेच वातविकारांवर उपयुक्त ठरणाऱ्या रानआवळ्यापासून पहिल्यांदाच मेळघाटात च्यवनप्राश निर्मितीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून आदिवासी महिलांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध झाला आहे.
advertisement

चिखलदरा आणि लगतच्या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात रानआवळ्याची झाडे आढळतात. साध्या आवळ्याच्या तुलनेत रानआवळा आकाराने लहान, पण पोषकतत्त्वांनी समृद्ध असतो. हा आवळा घनदाट जंगलात जाऊन काळजीपूर्वक तोडला जातो. फळ जमिनीवर पडू नये म्हणून झाडाखाली जाळी अंथरली जाते. डाग न लागलेले, ताजे आणि दर्जेदार आवळेच च्यवनप्राशसाठी निवडले जातात. रानआवळ्यात फायबरचे प्रमाण अधिक आणि साखरेचे प्रमाण कमी असल्याने त्यापासून तयार होणाऱ्या च्यवनप्राशला नैसर्गिक घट्टपणा येतो आणि टिकाऊपणाही वाढतो, अशी माहिती या उपक्रमाचे मार्गदर्शक डॉ. सुमिरत भालेराव यांनी दिली.

advertisement

35 औषधी घटकांनी समृद्ध च्यवनप्राश

मेळघाटात तयार होणाऱ्या या च्यवनप्राशमध्ये एकूण 35 प्रकारच्या औषधी वनस्पती आणि जडीबुटींचा समावेश आहे. रानआवळ्यासोबतच अश्वगंधा, शतावरी, पुष्करमूळ, विदरीकंद, नागरमोथा, पुनर्नवा, जिवंती, दालचिनी, तेजपत्र, खडीसाखर, गीर गाईचं तूप यांचा वापर केला जातो. हा च्यवनप्राश तयार करण्याची प्रक्रिया साधारण दोन दिवस चालते. संशोधनानुसार, हा च्यवनप्राश शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त असून, हिवाळ्यातील आजारांवर प्रभावी ठरतो. वर्षभर सेवनासाठीही तो सुरक्षित आणि लाभदायक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

advertisement

"लोकांच्या जॉब वर आपलं भागत नाही.."  नोकरी सोडून अंडा रोल व्यवसाय 2 भावांच्या स्ट्रगलची यशस्वी कहाणी

आदिवासी महिलांना रोजगाराचा नवा पर्याय

चिखलदरा, आमझरी, आलडोह, शहानूर या जंगल परिसरात रानआवळ्याची मोठी उपलब्धता आहे. जंगलातून रानआवळा संकलनाचे काम प्रामुख्याने स्थानिक आदिवासी महिला करतात. या महिलांना आवळा तोडण्यासाठी आवश्यक जाळ्या पुरविण्यात आल्या असून, संकलनापासून ते प्रक्रियेनंतर विक्रीपर्यंतचा संपूर्ण प्रवास महिलांच्याच सहभागातून व्हावा, यावर भर देण्यात येत आहे. यामुळे महिलांना जंगलावर आधारित पारंपरिक ज्ञानाला बाजारपेठ मिळत असून, त्यांचे आर्थिक स्वावलंबनही वाढत आहे.

advertisement

शिवस्फूर्ती क्लस्टरमुळे 600 महिलांना रोजगार

स्फूर्ती क्लस्टरच्या माध्यमातून मेळघाटातील पारंपरिक वनउपज प्रक्रिया उद्योगांना चालना दिली जात आहे. मध, जांभूळ, सीताफळ, कॉफी प्रक्रिया, हिरडा अशा विविध वनौषधी फळांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार केली जात आहेत. या उपक्रमांत सध्या 600 आदिवासी महिला सहभागी झाल्या असून, त्यांना घरबसल्या उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे, अशी माहिती स्फूर्ती क्लस्टरचे संचालक सुनील भालेराव यांनी दिली.

advertisement

रानआवळा च्यवनप्राशचे फायदे कोणते आहेत?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मकर संक्रांतीसाठी घेवर आणि फेनी, जालन्यात अतिशय प्रसिद्ध पदार्थ, इथं भरतंय बाजार
सर्व पहा

शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. सर्दी, खोकला, ताप आणि हिवाळ्यातील विकारांवर उपयुक्त ठरते. वात, संधिवात आणि सांधेदुखीच्या त्रासावर गुणकारी आहे. पिंपळी, वासा यांसारख्या घटकांमुळे श्वसन संस्थेचे कार्य सुरळीत ठेवण्यास आणि ऋतूबदलाच्या काळात संरक्षण देण्यास मदत मिळते. शरीरातील ताकद, उत्साह आणि कार्यक्षमता टिकून राहते. सुंठ, मिरे, पिंपळी यांसारख्या घटकांमुळे पचनशक्तीत सुधारणा होते. फायबरचे प्रमाण अधिक असल्याने आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. त्वचा आणि केसांची मजबुती टिकविण्यासही मदत करते. नियमित सेवन केल्यास स्फूर्ती आणि आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत होते, अशी माहिती डॉ. सुमिरत भालेराव यांनी दिली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
600 आदिवासी महिलांना मिळाला रोजगार, मेळघाटमध्ये रानआवळ्यापासून कसा बनवला जातोय च्यवनप्राश? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल