इंग्रजीचा पेपर घरी लिहायला दिला, ५० हजारांचा व्यवहार ठरला, पण भरारी पथकाला संशय आला अन् बिंग फुटलं
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मुख्य आरोपी असलेले गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे याला तात्काळ निलंबित करण्यात आले असून या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
संजय शेंडे, प्रतिनिधी, अमरावती: संपूर्ण राज्यात खळबळ उडविणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी दहावीचा परीक्षा पेपरफूट आणि चोरीप्रकरणी अंजगाव सुर्जी पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांसह एका पालकाला ताब्यात घेतले. गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे मजूर अनिल हाडोळे आणि एका पालकाला अटक करण्यात आलेली आहे. इंग्रजीमध्ये जास्त गुण मिळावेत यासाठी एका विद्यार्थ्याच्या पालकाचा आणि शिक्षकाचा ५० हजारांचा व्यवहार ठरला होता. परंतु भरारी पथकासमोर संबंधित पर्यवेक्षकाने दाखवलेल्या वेंधळेपणाने बिंग फुटले.
दहावीच्या या दोन्ही विद्यार्थ्यांना बालगृहात पाठवण्यात आलेले आहेत. याच प्रकरणातील आरोपी सुशील अभ्यंकर आणि एक पालक मात्र अद्यापही फरार आहेत. मुख्य आरोपी असलेले गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे याला तात्काळ निलंबित करण्यात आले असून या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी घरी बसून पेपर लिहिला असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
advertisement
भरारी पथकाला संशय आला अन् बिंग फुटलं
इंग्रजीचे दोन पेपर वेळ संपल्यानंतरही तब्बल अडीच तास बाहेर होते. ही बाब शिक्षण मंडळाच्या भरारी पथकाच्या लक्षात आली, अधिक चौकशी केली असता गैरव्यवहराचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. इंग्रजीच्या पेपरमध्ये चांगले गुण मिळावेत म्हणून एका विद्यार्थिनीचे पालक आणि उपपरिक्षक अभ्यंकर यांच्यात ५० हजार रूपयांचा व्यवहार ठरला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
advertisement
दहावीच्या विद्यार्थीनीला वेळ संपल्यानंतर अभ्यंकर याने सेंटरवरून उत्तरपत्रिका काढून दिली होती. त्यानंतर विद्यार्थिनीने घरी जाऊन ती उत्तरपत्रिका सोडवली. मात्र ज्यावेळी भरारी पथकाची अचानक एन्ट्री झाली, त्यावेळी अभ्यंकरनेच ती उत्तरपत्रिका विद्यार्थीनीच्या घरून बोलावली. त्यानंतर कस्टडी सेंटर असलेल्या महाविद्यालयाच्या गेटवर एकाकडे दिली होती, अशी माहिती समोर आली आहे.
आपापल्या घरी बसून पेपर लिहिले, कोणाकोणाचे आर्थिक हितसंबंध?
advertisement
चोरीला गेलेला पेपर विद्यार्थ्यांनी चक्क आपापल्या घरी बसून लिहिल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे पालक प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय वलय प्राप्त झाले आहे. या विद्यार्थ्यांकडे पेपर कसा पोहोचला आणि त्यात कोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 8:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
इंग्रजीचा पेपर घरी लिहायला दिला, ५० हजारांचा व्यवहार ठरला, पण भरारी पथकाला संशय आला अन् बिंग फुटलं









