प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला सुरू झालेले मनोज जरांगे यांचे उपोषण सहाव्या दिवशी स्थगिती करण्यात आले. यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे, भाजप आमदार सुरेश धस तसेच जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ उपस्थित होते.
आरक्षणासाठी येथून पुढे उपोषण करणार नाही, आता थेट मंत्र्यांना भिडणार, नडणार
आरक्षणाच्या मागणीसाठी येथून पुढे उपोषण करणार नाही. आता थेट मुंबईला जाऊन मंत्र्यांशी समोरासमोर लढू आणि भिडू. आम्हाला दिलेला शब्द जर पाळला नाही तर सरकारचे जगणे मुश्कील करू, असा इशारा त्यांनी दिला.शिंदे समितीला मुदतवाढ द्या, तिन्ही गॅझेट लागू करणार, विशेष कक्ष सुरू करणार, आरक्षण आंदोलनातील मुलांवरील केसेस मागे घ्या, आंदोलनात बलिदान झालेल्या दिलेल्या कुटुंबीयांना मदत द्या, अशा मागण्या जरांगे यांनी केल्या.
advertisement
... तर आम्ही सरकारला सुखाची झोप लागू देणार नाही
सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करायला सरकारला अजून दोन ते तीन महिने लागतील, असे सुरेश धस यांनी सांगितले. त्यावर मनोज जरांगे यांनीही तयारी दर्शवली. सरकारला हवे असतील तर अजून तीन महिने घ्या परंतु कायद्याची अंमलबजावणी कराच, असा आग्रह मनोज जरांगे यांनी धरला. जर यावेळी आम्हाला आश्वासन देऊन फसवले तर आम्ही सरकारला सुखाची झोप लागू देणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.
फडणवीस यांच्यावर बोललो नाही, बोलणारही नाही परंतु....
देवेंद्र फडणवीस यांना मी मराठा आरक्षणासंबंधी आणि आश्वासनासंबंधी प्रश्न केला होता. परंतु त्यांनी अद्याप मला प्रश्नाचे उत्तर दिले नाही. गेल्या तीन महिन्यांपासून मी त्यांच्यावर काहीच बोललो नाही, बोलणारही नाही. त्यांनी आता गोरगरीब मराठ्यांचे दु:ख जाणून निर्णय घ्यावा. नाहीतर मी मराठा समाजाशी बांधिल आहे, आम्ही आमची भूमिका ठरवू, असेही जरांगे म्हणाले.
