बीड, 30 ऑक्टोबर : मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे पाटील दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेले असतानाच मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय आंदोलकांनी पेटवलं आहे, तसंच जयदत्त क्षीरसागर यांच्या बीड शहरातील बंगल्यावर आंदोलकांनी दगडफेक केली आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांचं घरावरही दगडफेक करण्यात आली आहे, तसं त्यांच्या घराबाहेरील साहित्यही पेटवून देण्यात आलं.
advertisement
राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बीड येथील निवासस्थानाचीही तोडफोड करण्यात आली आणि आग लावली गेली. काही वेळातच आग घरभर पसरली आणि त्याच्या ज्वाळांनी जोर धरला. या जाळपोळीच्या घटनेनंतर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की, हल्ला झाला तेव्हा मी घरात होतो. सुदैवाने माझ्या कुटुंबातील कोणीही सदस्य किंवा कर्मचारी जखमी झाले नाहीत. आमदारांच्या घरांवर आणि कार्यालयांवर हल्ला केल्यानंतर बीडमध्ये शरद पवार गटाचे पक्ष कार्यालयही पेटवण्यात आले आहे.
मराठा समाजाच्या हिंसक आंदोलनाचं लोण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील पाहायला मिळत आहे. भाजप आमदार प्रशांत बंब यांचे गंगापूर शहरातील कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडले आहे. यावेळी कार्यालयातील सामानाची नासधूस करण्यात आली आहे. अचानक आलेल्या मराठा आंदोलकांनी बंब यांच्या कार्यालयातील काचा फोडल्या, खुर्च्या देखील तोडल्या आहे.
दुसरीकडे बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करून गाड्या जाळल्या आहेत तसेच ऑफिस देखील पेटवून देण्यात आलं. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे.