अहिल्यानगर मध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मिलिंद एकबोटे यांनी अजित पवारांवर टीका केली. मिलिंद एकबोटे यांनी म्हटले की, दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. गोरक्षकांनी गाड्या अडवू नये. गोरक्षकांवर आक्षेप घेताना अजित पवारांची जीभ चालली कशी, असा सवाल एकबोटेंनी केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "मला कुरेशी लोकांवर अन्याय झाल्याचे चालणार नाही" असे बेजबाबदारपणाचे वक्तव्य केलं असल्याचे मिलिंद एकबोटे यांनी म्हटले. अजित पवारांना असे वक्तव्य करताना जनाची नाही तर मनाची बाळगायला हवी होती असा घणाघात एकबोटे यांनी केला. अजित पवारांना मोदींचा आशीर्वाद मिळाला आणि त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले आहे याची जाणीव पवारांनी ठेवावी. भगव्याचा मान राखून हिंदुत्वाची जाण राखली पाहिजे असं मिलिंद एकबोटे म्हणाले.
advertisement
त्यामुळेच अजित पवार उपमुख्यमंत्री झाले...
मिलिंद एकबोटे यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली. त्यांनी म्हटले की, लोकसभेत अजित पवारांच्या पक्षाला एकच जागा मिळाली होती. त्यावेळी त्यांचा चेहरा पडला होता, डोळ्यावर गॉगल लावून फिरत होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मोदी आणि हिंदुत्ववाद्यांमुळे त्यांना यश मिळाले, त्यानंतर ते उपमु्ख्यमंत्री झाले, याची त्यांनी जाणीव ठेवावी असेही मिलिंद एकबोटे यांनी म्हटले. पोलिसांनी गोरक्षकांना मदत करू नये असे, थेट वक्तव्य करतात, याचा मी निषेध करत असल्याचेही एकबोटे यांनी म्हटले.
गोरक्षकांवर आक्षेप, कुरेशी समाज संपावर...
गोरक्षकांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला असून नाहक मारहाण होत असल्याचा आरोप कुरेशी समाजाकडून करण्यात आला. सर्व प्रकारची मंजुरी, कायदेशीर बाबी प्रक्रिया पू्र्ण असतानाही गोवंशाच्या तस्करीचा आरोप करत पशू वाहतूक करणाऱ्यांना मारहाण केली जात आहे. त्याशिवाय, मांस विक्री करणाऱ्यांनाही लक्ष्य केले जात असल्याचा आरोप कुरेशी समाजाकडून करण्यात आला आहे. पोलिसही तक्रारींची दखल घेत नसल्याचे सांगत राज्यातील कुरेशी समाजाने मांस व्यवसाय बंद ठेवला आहे. त्याच्या परिणामी भाकड जनावरांचा प्रश्न निर्माण शेतकरीदेखील हवालदिल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याची दखल घेत पोलिसांना काही सूचना केल्या होत्या. त्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी अजित पवारांवर आता सडकून टीका केली आहे.